राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:26 AM2019-07-25T03:26:13+5:302019-07-25T06:26:48+5:30
५४ टक्के पावसाची तूट जलसाठे अद्याप कोरडे, पेरण्यांवरही संक्रांत
रूपेश उत्तरवार
यवतमाळ/मुंबई : जुलै संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यातील २४ जिल्ह्यांवर भीषण दुष्काळाचे संकट येण्याची परिस्थिती आहे. ३५५ तालुक्यांपैकी ४१ तालुक्यात केवळ ४० टक्के तर १५४ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात जलसंकट ओढावले आहे.
यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, हा हवामान खात्याचा अंदाज वरुणराजाने साफ खोटा ठरवला. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैकडे शेतकऱ्यांनी आशा लावली होती, मात्र या महिन्यात किरकोळ सरी बरसवून पाऊस ढगातच दडून बसला. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरलीच नाही. खरीप पिकांचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून २२ जुलैपर्यंत १०९.८२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असा कृषी खात्याचा दावा आहे. मात्र पावसाची आकडेवारी पाहाता हा दावा कितपत खरा आहे, याविषयी साशंकता आहे.
मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद वगळता सहा जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि नंदुरबार तर विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत सरासरीच्या ४० ते ५० टक्केच पाऊस झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये ५४ टक्के पावसाची तूट आहे.
आता उशिरा पाऊस बरसला तरी कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांऐवजी शेतकºयांना मका, तूर अशा दुय्यम पिकांची पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
आठ दिवसांनी खरीप कर्जवितरण थांबणार
दुष्काळी स्थितीने कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकºयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचा आदेश काढून सरकारने तो राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविला. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा कर्ज पुनर्रचनेस तयार नाहीत. तशा तक्रारी शेतकºयांनी संबंधित जिल्हाधिकाºयांकडे केल्या. आता खरीप कर्जवितरणासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कर्जवितरण थांबणार आहे. तथापि राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण अद्यापही ३० टक्क्यांपेक्षा पुढे सरकले नाही. यामुळे पुढील आठ दिवसांत उर्वरित कर्ज वितरण होईल काय, असा प्रश्न आहे.
१३०० शेतकºयांच्या आत्महत्या : नापिकी व दुष्काळी स्थितीमुळे ६ महिन्यांत १३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. अमरावती विभागात ४६३ तर औरंगाबाद विभागात ४३४ आत्महत्या झाल्या. बुलडाणा १३४, अमरावती १२२, यवतमाळ ११३, बीड ९६, अहमदनगर ७१, उस्मानाबाद ६६, तर औरंगाबाद ६३ अशी आत्महत्यांची नोंद आहे.