पवारांकडून दुष्काळाचे राजकारण - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:44 AM2019-05-06T03:44:40+5:302019-05-06T03:45:07+5:30
‘राफेल’सह ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केल्याने आपणाला शरद पवार यांची चिंता वाटते. आता तर त्यांनी दुष्काळाबाबत सरकारवर टीका केली.
कोल्हापूर : ‘राफेल’सह ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केल्याने आपणाला शरद पवार यांची चिंता वाटते. आता तर त्यांनी दुष्काळाबाबत सरकारवर टीका केली. अपुऱ्या माहितीच्या आधारे वातावरण विचलित करण्याचे काम ते करीत असून, दुष्काळासारख्या संकटाला राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे सामोरे जायला पाहिजे; पण दुर्दैवाने पवार दुष्काळाचे राजकारण करीत असल्याचा पलटवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
पाटील म्हणाले, मागील वर्षी जून, जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने बंपर पीक येईल असे वाटत असतानाच आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्टÑातील काही तालुके आणि विदर्भातील बुलडाणा जिल्ह्याला त्याचा फटका बसला. दुष्काळाच्या झळा या भागाला बसू नयेत, म्हणून आम्ही आॅक्टोबरमध्येच दुष्काळी तालुके जाहीर केले. त्यानंतर लगेच केंद्राचे पथक आले आणि १५१ तालुके दुष्काळी जाहीर करून ४७०० कोटींचा निधी मंजूर केला.
अॅपद्वारे छावण्यांतील भ्रष्टाचाराला पायबंद
जनावरांच्या कानाला एक टॅग लावून रोज अॅपद्वारे जनावरांची हजेरी घेतली जाणार आहे. त्यानंतर रोजची संख्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविली जाईल, त्यानुसारच निधी वितरीत केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
गृहखात्याच्या सूचनेनुसारच
मंत्रालयाच्या पायºया काढल्या
मंत्रालयाच्या परिसरात गाड्याही जात नव्हत्या. आगीसारखे प्रसंग उद्भवले तर सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथील पायºया काढण्याची सूचना गृह विभागाने दिली होती. त्यानुसार तीन ‘आयएएस’ अधिकाºयांची समिती नेमून पायºया काढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पाटील यांनी दिली.
दृष्टिपथात उपाययोजना
मागेल तिथे चारा छावणी, १,२६४ छावण्यांत ८ लाख ३२ हजार २९ जनावरे.
टँकरची स्थिती : ३,६९९ गावे व ८,४१७ वाड्यांत ४,७७४ टँकरद्वारे पाणी पुरवठा. कोकणात ८६, खान्देशात १,१४९, पुणे विभागात ७५७, औरंगाबाद विभागात २,५३४, अमरावती २१८ तर नागपुरात ३० टॅँकर सुरू आहेत.
चारा : अहमदनगर ४७१, पुणे १११, मराठवाड्यात ६८२ छावण्यांत ८ लाख ३२ हजार २९ जनावरे. प्रतिदिनी मोठ्या जनावरांना ९०, तर लहान जनावरांना ४५ रुपये अनुदान.
शेती : चालू वीज बिलात ६७३.४१ कोटींची (३३.५ टक्के) सवलत. ६७ लाख ३० हजार ८६५ शेतकºयांना ४४१२ कोटींच्या
मदतीचे वाटप. थकीत वीजबिलापोटी बंद असलेल्या ३३२० पाणी योजना पूर्ववत.
रोजगार : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ३४ हजार ४३१ कामे सुरू. त्यांवर २ लाख ७४ हजार ६४३ मजूर
उपस्थित.
सरकारचे दुष्काळावरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष, भारतीय किसान संघाचा घरचा अहेर
सांगोला (जि. सोलापूर): सरकारकडून दुष्काळासंदर्भात उपाययोजना न करता जनतेला मदतीपासून वंचित ठेवले जात आहे. कामचुकार लपवण्यासाठी निवडणूक व आचारसंहितेची ढाल पुढे केली जात आहे. या सुस्त यंत्रणेला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्याची भूमिका भारतीय किसान संघाने घेतल्याची माहिती प्रांताध्यक्ष बळीराम सोळंके यांनी दिली.
भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांतिक कार्यकारिणीची चिंतन बैठक झाली. बैठकीला संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, रावसाहेब शहाणे-पाटील आदी उपस्थित होते.
रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू असून या कामात भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अक्षम्य त्रुटी असून जमिनीच्या मोबदल्यासाठी केलेले निवाडे सदोष आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. आॅक्टोबरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रशासनाला रस्ते, वीज, पाणी, बाजारभाव आदी प्रश्नांवर धारेवर धरले जाईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी परिषद भरविण्याचे ठरले, असे संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी सांगितले.