दुष्काळाचा मुद्दा विधिमंडळात उचलणार!
By admin | Published: March 5, 2016 02:55 AM2016-03-05T02:55:08+5:302016-03-05T02:55:08+5:30
विखे पाटील यांचा अकोला, वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा.
अकोला: दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच असून, शेतकर्यांना दिलासा मिळेल, यासाठी सरकारकडे कोणतेच धोरण नसल्याची टीका करीत विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळासह रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात सरकारला जाब विचारण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला. विखे पाटील यांनी शुक्रवारी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला.
दुष्काळात शेतकरी, जनता होरपळत असताना, जनतेच्या मागे विश्वासाने उभे राहणे गरजेचे आहे; मात्र मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हय़ाधिकार्यांकडून आढावा घेऊन शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याचे टीकास्त्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर डागले. पिके हातची गेली, उत्पन्न नाही, हातात पैसा नाही, कर्जापायी कंटाळलेले शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजपाचे खासदार त्यांचा उपहास करतात, टिंगल उडवतात. मराठवाड्यातील गावंच्या गावं (पान १ वरुन) अन्नाच्या शोधासाठी स्थलातंरित होत आहेत. अशावेळी शेतकर्यांचा उपहास, टिंगल करणार्या भाजप खासदारांची बौद्धिक दिवाळखोरी समोर येत आहे. दुष्काळी भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी अकोला जिल्ह्याच्या दौर्याप्रसंगी केला. अकोला जिल्ह्यातील किनखेड, गांधीग्राम आणि बाभूळगाव आदी गावांना भेट देऊन त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. वाशिम जिल्ह्यातील मेडशीनजिकची आदिवासी गावं कोळदरा आणि वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मेडशी येथे त्यांनी दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईबाबत शेतकर्यांशी संवाद साधला. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. चार्याअभावी जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत आणि सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. हे सरकार शेतकर्यांचे नसून उद्योगपतींचे आहे. शेतकर्यांचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची हजारो कोटी रूपयांची कर्ज माफ केली जातात, असा आरोप त्यांनी केला.
चारा छावण्या बंद; लावण्या सुरू
राज्यात, मराठवाड्यात पाणी, चार्यावाचून गुरे दगावत असताना, राज्य शासनाने चारा छावण्या बंद केल्या असून, लावण्या सुरू केल्या (डान्स बार) आहेत. डान्स बार बंद करण्यास कायद्यात काय बदल करायचे ते करावेत, यासाठी काँग्रेस सरकारच्या सोबत असेल, पण सरकारने या बाबतीत मौन धारण केले असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.