पंकजा यांचा दुष्काळ‘सेल्फी’
By admin | Published: April 19, 2016 04:36 AM2016-04-19T04:36:18+5:302016-04-19T14:02:29+5:30
येथील मांजरा नदीच्या खोलीकरणाला भेट दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी काढलेला सेल्फी आणि केलेले फोटोसेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
लातूर : येथील मांजरा नदीच्या खोलीकरणाला भेट दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी काढलेला सेल्फी आणि केलेले फोटोसेशन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनीच टिष्ट्वटरवर टिष्ट्वट केलेल्या ‘सेल्फी’वर नेटिझन्स्नी टीकेची झोड उठविली. यानंतर दिवसभर वृत्तवाहिन्यांवर चाललेल्या या सेल्फीच्या रामायणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्तिश: मुंडे यांच्यासोबत राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.
लातूरच्या मांजरा नदीवर लातूरकरांनी स्वत: जमविलेल्या निधीतून साई आणि नागझरी बंधाऱ्याच्या १८ किमी खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. रविवारी पंकजा मुंडे यांनी या कामाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड यांचीही उपस्थिती होती. नदीच्या खोलीकरणाचे काम पाहून भारावलेल्या पंकजा यांनी नदीच्या पात्रात उतरून आपल्या मोबाइलमधून फोटोसेशन केले. इतकेच नव्हेतर, खोदलेल्या नदीसमोर उभे राहून सेल्फीही काढले. यातीलच एक सेल्फी त्यांनी टिष्ट्वट करून ‘सेल्फी वुईथ ट्रेंच आॅफ साईड बॅरेज मांजरा.. वन रिलिफ टू लातूर’ असा मजकूरही पोस्ट केला. परंतु ही पोस्ट पडताच टिष्ट्वटरवरून नेटिझन्स्नी एकच हल्लाबोल केला. ‘आता मदत द्यायचे सोडून सेल्फी काढा’, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसोबत सेल्फी काढा’ ‘मंत्र्यांनी उपाय सुचवावेत, सेल्फी काय काढता’ अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाही
नवी दिल्ली: मराठवाडा भीषण दुष्काळाने होरपळत असताना महाराष्ट्राचे मंत्री दुष्काळी पर्यटनासाठी आल्यासारखे स्वत:चे ‘सेल्फी’ काढतात यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, हेच स्पष्ट होते, अशी खरमरीत टीका काँग्रेसने सोमवारी केली.
काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, लोकांच्या हितासाठी काम करण्याऐवजी मंत्र्यांनी स्वत:चे ‘प्रमोशन’ करायचे हाच फडणवीस सरकारचा अग्रक्रम असल्याचे पंकजा मुंडे यांच्या वागण्यावरून दिसते. चतुर्वेदी म्हणाल्या की, सेल्फी पर्यटन हे मराठवाड्याच्या समस्यांवर उत्तर नाही. सेल्फी/ दुष्काळी पर्यटनाने सर्व प्रश्न सुटू शकतात, असे राज्य सरकारला वाटते की काय?
-----------------------------
सेल्फीचे राजकारण नको : भाजपा
भारतीय जनता पक्षाने मात्र सेल्फी प्रकरणामुळे अडचणीत आला असून, झाल्या प्रकाराचे कोणी राजकारण करू नये, अशी भूमिका त्या पक्षाने घेतली आहे. महाराष्ट्र सरकार राज्याच्या दुष्काळी भागातील जनतेला पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लातूरमध्ये रेल्वेने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याकडे दुर्लक्ष करून, सेल्फीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि राज्य सरकारवर टीका करणे योग्य नाही, असे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. मात्र हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
(प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क)