दुष्काळ आढावा बैठक झटपट उरकली!
By admin | Published: August 24, 2015 01:27 AM2015-08-24T01:27:00+5:302015-08-24T01:27:00+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने औरंगाबादेत आलेले मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी
औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने औरंगाबादेत आलेले मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा हातघाईवर उरकून घेतला. विभागातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने काँग्रेससह शिवसेनेच्या आमदारांनी टीकेचा सूर आळवला.
रविवारी मराठवाड्यातील दुष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला महसूलमंत्री एकनाथ खडसे अर्धा तास उशिराने पोहोचले; तर शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी परिवहनमंत्री दिवाकर रावते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे दोघेच उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह भाजपाच्या काही आमदारांनी बैठकीला हजेरी लावली. मराठवाड्यातील इतर लोकप्रतिनिधींना बैठकीचे निमंत्रणच नव्हते. त्यामुळे कोणीच तिकडे फिरकले नाही.
मुख्यमंत्र्यांनी घाईगडबडीत मराठवाड्यातील दुष्काळाचा गंभीर विषय हाताळला, अशी टीका काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांनी केली. दुष्काळी परिस्थितीवर स्वतंत्र मंत्रिमंडळाची बैठक लावली असती तर काहीतरी निष्पन्न झाले असते, असे मत नांदेडचे आ. नागेशराव आष्टीकर यांनी व्यक्त केले. तर आमदारांना निमंत्रण दिले नसल्याबद्दल आ. संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)