दुष्काळी भागासाठी वेगळा विचार करावा
By admin | Published: August 17, 2015 12:40 AM2015-08-17T00:40:40+5:302015-08-17T00:40:40+5:30
राज्यात मराठवाडा आणि खान्देशात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने वेगळा विचार करुन भरीव
परभणी : राज्यात मराठवाडा आणि खान्देशात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने वेगळा विचार करुन भरीव तरतूद करावी, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी रविवारी येथे दुष्काळ परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शासनाचा दुटप्पीपणा याची माहिती दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात आगामी काळात उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि या संकटाचा सामना करण्यासाठी पाऊले उचलण्यासाठी सांगितले होते. मात्र अडीच महिन्यांत शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे सध्या गंभीर परिस्थिती ओढवली आहे.
कर्ज पुनर्गठण, विम्याचे वितरण याबाबत शासन कुठलेही धोरण अवलंबत नाही. आगामी काळात पाऊस पडला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी वेगळा विचार करुन तत्काळ पाऊले उचलावीत, चारा छावण्या सुरु कराव्यात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच मनरेगाच्या धोरणात बदल करण्याची मागणी त्यांनी केली. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर मनगरेगातून काम करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी त्यांनी
केली. (प्रतिनिधी)