दुष्काळ दूर व्हावा!
By admin | Published: November 23, 2015 02:45 AM2015-11-23T02:45:37+5:302015-11-23T02:45:37+5:30
‘राज्याला दुष्काळातून बाहेर काढ. बळीराजावरील संकट दूर कर,’ असे साकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी पांडुरंगाला घातले.
पंढरपूर : ‘राज्याला दुष्काळातून बाहेर काढ. बळीराजावरील संकट दूर कर,’ असे साकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी पांडुरंगाला घातले.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. खडसे म्हणाले, ‘नैसर्गिक आपत्तींशी सध्या शेतकऱ्यांचा सामना सुरू आहे. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे.’
राज्यातून सव्वा लाख मे. टन तूर डाळ छापे मारून जप्त केली व त्यातील केवळ १३ हजार मे. टन डाळ विक्रीस काढली, असा आरोप होतो त्याबद्दल विचारल्यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘जप्त केलेली डाळ ही केवळ तूर डाळ नव्हती, त्यात चणा व इतर डाळी आहेत. कुणी नियमबाह्य पद्धतीने साठेबाजी केली असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर करण्यात येईल,’ असे खडसे म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कॅम्प तालुक्यातील जादूवाडी येथील दामोदर रतन सोमासे (८५) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई (७८) या रांगेत उभ्या असलेल्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. गेल्या पाच वर्षांपासून ते कार्तिकी वारी करत असून, विठ्ठलाच्या महापूजेचा मान हा आयुष्यातील सर्वांत सुखाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नवी मंदिर समिती लवकरच
‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर फार काळ प्रशासक ठेवण्यात येणार नाही. सध्याच्या समितीचे काम चांगले केले असले, तरी लवकरच नवीन समिती अस्तित्वात येईल. त्यामध्ये वारकरी सांप्रदायाचा एक प्रतिनिधी घेण्यासाठी मी आग्रह करणार आहे,’ असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.