जिरायती भागात तीव्र दुष्काळी स्थिती
By admin | Published: April 29, 2016 01:44 AM2016-04-29T01:44:50+5:302016-04-29T01:44:50+5:30
वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव, कौठडी, कुसेगाव, पडवी या भागातील जनतेबरोबरच वन्य प्राणी व पशुपक्ष्यांनाही तीव्र दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत
वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव, कौठडी, कुसेगाव, पडवी या भागातील जनतेबरोबरच वन्य प्राणी व पशुपक्ष्यांनाही तीव्र दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत असल्याने घोटभर पाणी मिळवण्यासाठी या प्राण्यांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे.
यासाठी शासनस्तरावरून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. मात्र पाळीव जनावरांबरोबरच वन्य प्राणी व पशुपक्ष्यांना
पाणी मिळणे कठीण झाले
आहे. अशा परिस्थितीत हे
प्राणी पाण्याच्या शोधात सैरावैरा भटकंती करतात.
पिण्यासाठी पाणी शोधत असताना अनेक वेळा या प्राण्यांना मानवी वस्तीकडे धाव घ्यावी
लागते. या वेळी वनविभागाच्या हद्दीतून जात असताना अनेक वेळा महामार्ग ओलांडावा लागतो. तसेच मोकाट कुत्र्यांच्या व शिकारी करणाऱ्यांच्या तावडीतून सुटणे मुश्कील होते.
अशा वेळी अनेक वेळा या प्राण्यांना आपला जीव वाचवणे कठीण झाले आहे. तर पशुपक्ष्यांनाही पाणी उपलब्ध नसल्याने सार्वजनिक नळकोंडाळी अथवा मानवी वस्तीचा सहारा घ्यावा लागत आहे.
>वासुंदे परिसरात नुकतेच एक हरिण पाण्याच्या शोधात भटकंती करताना घायाळ झाले होते. हिंगणीगाडा परिसरामध्येही पाण्यासाठी भटकंती करताना दोन चिंकारांना विजेच्या धक्क्याने जीव गमवावा लागला. दिवसेंदिवस तालुक्याच्या जिरायत भागातील ऊन्हाचा पारा वाढतच असून सर्वच सजीव जातीला घोटभर पाण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन भटकंती करावी लागत आहे.
>दौंड परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, थेंबभर पाण्यासाठी रस्ता ओलांडताना हरिण व नळकोंडाळ्याचा आधार घेताना कावळा.