पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ, मराठवाडा कोरडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 10:52 AM2019-08-09T10:52:03+5:302019-08-09T10:59:38+5:30
राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे.
पुणे : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागांत पाण्याचा ठणठणाट असून, विदर्भातील नागपूर विभागामधे देखील पाणीबाणीची स्थिती आहे. अमरावतीमधे अवघा १८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण, पुणे आणि नाशिक वगळता राज्यातील अनेक मोठ्या धरणांत अजूनही क्षमतेच्या निम्माही पाणीसाठा झालेला नाही.
मॉन्सूनचा दोन महिन्यांचा काळ लोटला तरी मराठवाडा आणि विदर्भातील धरणात पुरेसा साठा नाही.
राज्याच्या दुसऱ्या भागामधे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामधे दोन महिन्यांतच मॉन्सूनची सरासरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वात मोठे असलेले उजनी धरण (११७.४७ टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली.
राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे. जुलैच्या अखेरीपर्यंत औरंगाबाद विभागात क्षमतेच्या अवघा पाऊण टक्के साठा येथील धरणांत होता. नाशिकमधे झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडी (पैठण) धरणात क्षमतेच्या ६५ टक्के साठा झाला आहे. जवळपास ७७ टीएमसी पाणी जायकवाडीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट साठा आहे. औरंगाबाद विभागाचा विचार केल्यास तेथे क्षमतेच्या अवघा २१.९४ टक्केच साठा आहे. पैठण वगळता औरंगाबाद विभागातील बीडमधील मांजरा, हिंगोलीचे येलदरी, सिद्धेवर, नांदेडचे निम्म मनार, उस्मानाबादचा सिना, तेरणा आणि परभणीच्या दुधना प्रकल्पामधे पाण्याचा अक्षरश: खडखडाट आहे.
राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
विभाग एकूण एकूण आजचा टक्केवारी
उपयुक्त साठा साठा उपयुक्त साठा
अमरावती १४८.०६ १७६.३५ २७.३८ १८.८
औरंगाबाद २६०.३१ ३२५.८२ ५७.११ २१.९४
कोकण १२३.९४ १२९.६४ १०४.९९ ८४.७१
नागपूर १६२.६७ १९७.०१ ४९.१७ ३०.२३
नाशिक २१२ २४३.२३ १०९.६६ ५१.७३
पुणे ५३७.१२ ६७४.९२ ४४४.७५ ८२.८
एकूण १४४४.१३ १७१९.८२ ७९३ ५४.९५
अमरावती विभागातही तीच स्थिती आहे. तेथे अवघा २२ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यातील वाणमधे क्षमतेच्या निम्मा, बुलडाण्याच्या पेनटाकळीमधे ४२ टक्के, यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पात १८.२७ टक्के पाणसाठा आहे. या प्रकल्पातील मोठ्या प्रकल्पांमधेच पाणी नसल्याने येथेही वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द या मोठ्या प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा असून, गोंदियातील इटियाडोहला ५१ आणि निम्न वर्धा येथे २१ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रपूरमधील ओसाळमेंढा पूर्ण क्षमतेने भरला आहे. नागपूरमधील तोतलाडोह या मोठ्या प्रकल्पात अवघा ०.१ टक्के साठा असून, विभागातील इतर ठिकाणी सरासरी पंचवीस ते तीस टक्केच पाणी आहे.