बुडून होणारे मृत्यू करतात समुद्राला बदनाम

By admin | Published: February 2, 2016 03:35 PM2016-02-02T15:35:48+5:302016-02-02T15:37:58+5:30

किना-यावरील नागरिक व स्थानिकांच्या धोकेविषयक सूचना नाकारणे, बेफिकीरीने समुद्रात जाणे यामुळेच अनेक पर्यटक कोकणातील समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडतात, असे समोर आले आहे.

The drowning of the sea, and the drowning of the sea | बुडून होणारे मृत्यू करतात समुद्राला बदनाम

बुडून होणारे मृत्यू करतात समुद्राला बदनाम

Next
>जयंत धुळप
अलिबाग, दि. २ - सोमवारी रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे सहलीसाठी आलेल्या पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या १४ जणांचा मुरु़डच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. इनामदार कॉलेजच्या बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स व बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन विभागाचे एकूण १४३ विद्यार्थी सहलीसाठी गेले होते, त्यापैकी १० विद्यार्थिनी, तीन विद्यार्थी आणि एक प्राध्यापिका अशा (१९ ते २३ वयोगटातील) एकूण १४ जणांचा समावेश आहे. यापैकी १३ जणांचे मृतदेह सोमवारी संध्याकाळी मिळाले तर १४वा व अखेरचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. त्यानंतर नौदल व तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्स द्वारे, स्थानिक रायगड पोलीस आणि मच्छिमार बांधवांची शोध मोहिम थांबविण्यात आली. 
 
स्थानिकांच्या सूचना नाकारणे ठरते घातक
या दुर्दैवी घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरुन गेला आणि कोकणातील समुद्रात बुडून मृत्यूमूखी पडणा-या पर्यटकांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली. कोकणात आणि विशेषत: रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीत आजवर समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे ‘किना-यावर उपस्थित स्थानिकांच्या धोकेविषयक सूचना नाकारणे, बेफिकीरीने समुद्राच्या पाण्यात जाणे आणि दूर्दैवी मृत्यू ओढावून घेणे’ ही एकमेव समान परिस्थिती असल्याचे स्थानिक कोळी बांधव आणि पोलीस यांच्या निरीक्षण व नोंदीतून सातत्याने स्पष्ट झाले आहे. 
 
सोमवारच्या दुर्दैवी प्रसंगातही स्थानिकांच्या सूचना नाकारल्या गेल्या
सोमवारी मुरुड येथे घडलेल्या घटनेच्यावेळी देखील हीच परिस्थिती अनुभवास आली. ज्यावेळी सहलीतील विद्यार्थी येथे आले व जेवण झाल्यावर त्यापैकी काही मुलं-मुली समुद्रात जाऊ लागले त्यावेळी तेथील स्थानिक नागरिक व जीवरक्षकांनी त्यांना ‘आता समुद्राला ओहोटी आहे पण पाण्याच्या प्रवाहाचा, खोलीचा अंदाज येणार नाही, तुम्ही समुद्रात ओढले जाल’ असे अनेकदा आवर्जून सांगितलं. पण मुलांनी ती धोक्याची सूचना नाकारत समुद्रात प्रवेश केल्याचे स्थानिकांनी सांगीतले. समुद्रात थोड्या अंतरावर एक खांब होता, त्याला हात लावण्याची स्पर्धा या मुलांमध्ये लागली होती, त्या स्पर्धेपोटी हे विद्यार्थी समुद्रात गेले, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आणि अखेर नको तेच घडले...
 
सागरी पाण्याची कल्पना नसणा-या पर्यटकांचे मृत्यू
मुरुड समुद्र किनारी यांच ठिकाणी यापूर्वी महिंद्रा कंपनीतील ११ कर्मचा-यांचा, तर ६ जुलै २०१४ साली घाटला(चेंबूर) गावांतील सहा जणांचा, रत्नागिरी जिल्ह्यात सहा जणांचा, बेळगांव मधील दोन बहिणींचा सिंद्धूदूर्ग जिल्ह्यात देवबाग येथे, तर २६ सप्टेंबर २०१५ रोजी गुहागर समुद्रात सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता. या सर्व घटनांच्या आधी स्थानिकांनी त्या पर्यटकांना धोक्याची सूचना आणि कल्पना दिली होती, पण त्यांनीही ती नाकारली होती, असे पोलीस नोंदीत नमूद केले आहे. हे सारे पर्यटक समुद्र किना-यापासून लांबच्या भागातील रहिवासी असल्याने त्यांना समुद्राचा अनुभव नव्हता. समुद्राची स्थानिक पातळीवरील माहिती नसणे आणि स्थानिकांच्या सूचनांचा अव्हेर यामुळे या दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
गणेश विसजर्नास १० लाखांवर स्थानिक समुद्रात, पण बुडून मृत्यू नाही
कोकणच्या किनारपट्टीत दिड दिवसांच्या, पाच दिवसांच्या, गौरी-गणपती, अनंत चतुर्दशी व २१ दिवसांच्या गणेश विसजर्नावेळेस सुमारे ७ ते १० लाख वा त्याहून अधिक लोक समुद्रात व समुद्र किनारी असतात. त्याच बरोबर दसरा व त्याचा दुसरा दिवस या दिवशी देवींच्या मुर्तीच्या विसजर्नाच्या निमीत्ताही बरेच लोक समुद्रात उतरतात. पण याप्रसंगी समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या घटनांचे प्रसंग पोलीस नोंदीत नाहीत. या दिवशी समुद्रावर असणारे हे लोक स्थानिक असतात. त्यांना समुद्राच्या भरती-ओहोटीची पूर्ण कल्पना असते. समुद्राचे प्रवाह, खोली आणि धोकादायक ठिकाणे यांची माहिती असते, त्यामुळे गेली कित्येक वर्षांपासून या दिवशी समुद्रावर जाणा-या स्थानिकांचा कधीही बुडून मृत्यू झालेला नाही, हे वास्तव आहे. 
 
भरती-ओहोटीच्यावेळी तात्पुरते बदलणारे प्रवाह, निर्माण होण्या-या घळी
समुद्रास भरती आणि ओहोटी येत असताना, पाण्याचे प्रवाह वेगवान असतात. किनारा आणि त्या समोरील समुद्रात असणारे सागरी किल्ले आणि मोठे खडक यांना दोन्ही बाजूने वळसे घालून भरतीच्या वेळी पाणी किना-याकडे तर ओहोटीच्यावेळी पाणी किना-याकडून समुद्राकडे जात असते. भरतीच्यावेळी तात्कालिक बदलणा-या पाण्याच्या प्रवाहामुळे सागरी किल्ले वा मोठे खडक यांच्या व किना-यांमधील वाळू बाजूला सरकून तेथे तात्कालिक घळ (मोठ्या खोलीचा खड्डा) तयार होते. जी भरतीच्या पाण्याखाली असल्याने दृष्टीस येत नाही. चार तासाच्या कालावधी नंतर भरतीचा कालखंड संपून ओहोटीचा कालखंड सुरु झाला की समुद्र किना-याकडे आलेले भरतीचे पाणी आल्यामार्गे परतीच्या मार्गास लागते आणि सागरी किल्ले वा मोठे खडक यांच्यामागे जाते. यावेळी भरतीच्यावेळी पाण्याच्या प्रवाहांनी आणलेली वाळू पून्हा समुद्राकडे घेऊन जातात आणि ही वाळू तात्कालीक घळीमध्ये पुन्हा जमा होऊन तेथील भूभाग पूर्ववत होतो. 
 
कुलाबा किल्ल्यासमोर तात्कालीक घळीतच पर्यटकांचे बुडून मृत्यू
भरती-ओहोटीच्या वेळची ही तात्कालीक घळ निर्मिती व पूनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला व अलिबागचा किनारा यामध्ये अनेकदा अनुभवास येते. ओहोटीच्यावेळी ज्या भूभागावरुन कुलाबा किल्ल्यात चालत गेलो तेथे भरतीच्यावेळी घर वा मोठा खड्डा होतो हे बाहेरुन आलेल्या पर्यटकांच्या लक्षात येत नाही, परिणामी अलिबाग समुद्र किनारी यापूर्वी झालेले बुडून मृत्यू हे याच ठिकाणी झाले आहेत आणि ते पर्यटक भरतीच्यावेळी कुलाबा किल्ल्यातून अलिबाग किना:याकडे येण्याचा प्रयत्न करीत असतानाच झाले आहेत याचीही नोंद पोलीस दप्तरी आहे.
 
पर्यटनाचा आनंद लुटताना सुरक्षेला प्राधान्य गरजेचे
पर्यटकांच्या सागरी मृत्यूमूळे समुद्राला बदनाम करण्यापेक्षा, पर्यटनाचा आनंद लुटताना स्थानिक परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक निर्बंध-नियम यांची माहिती स्थानिकांकडून करुन घेऊनच पुढील पाऊल टाकणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे. पाणी सर्वत्र सारखे नसते, स्विमींग पूल मध्ये पोहता आले म्हणजे कोणत्याही जलाशयात आपण पोहू शकतो असा खोटा आत्मविश्वास मनात ठेवून आपल्याच जीवनास आव्हान देण्याचे खोटे धाडस करणो योग्य नाही, असाच बोध या दुर्दैवी घटनांनंतर घेणे आवश्यक आहे, इतके मात्र नक्की.

Web Title: The drowning of the sea, and the drowning of the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.