जिल्ह्यातील १९ डॉक्टरांचा कारभार संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 12:56 AM2017-02-05T00:56:25+5:302017-02-05T00:56:25+5:30
छुप्या मार्गाने गर्भलिंग तपासणी : कारवाईचा स्कॅनर फिरणार, ‘हिटलिस्ट’नुसार हालचालीवर गोपनीय नजर
एकनाथ पाटील--कोल्हापूर --गर्भलिंग तपासणीमध्ये जिल्ह्यातील १९ डॉक्टरांचा संशयास्पद कारभार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टर बनून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांमध्ये काही पदवीधारकांसह बोगस डॉक्टरांचा समावेश आहे. हे सर्व डॉक्टर ‘हिटलिस्ट’वर असून, त्यांच्या हालचालीवर गोपनीय नजर ठेवून लवकरच त्यांच्यावर कारवाईचा स्कॅनर फिरविला जाणार आहे.
डॉक्टर हा समाजातील एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. डॉक्टर बनण्यासाठी किमान सहा वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कंपौंडरनी आता झटपट पैसा मिळविण्यासाठी स्वत:च डॉक्टर बनून ग्रामीण भागात राजरोस दवाखाने सुरू केले आहेत. डॉक्टर नसून कंपौंडर आहे याची पुसटशीदेखील परिसरातील नागरिकांना कल्पना नसते. गर्भलिंग चाचणीसह गर्भपात करण्यामध्ये ते पटाईत आहेत. दवाखान्याची नोंदणी शासनदरबारी नसते.
वर्षापूर्वी जुना वाशी नाका चौकात आलिशान कारमध्ये गर्भलिंग तपासणी करताना बोगस डॉ. हिंदुराव पोवार, डॉ. हर्षल नाईक, चालक सुशांत दळवी या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. पोलिस तपासामध्ये या रॅकेटची व्याप्ती मुंबईपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले होते. या कारवाईनंतर अन्य डॉक्टरांनी हा व्यवसाय जिल्ह्यात बंद ठेवून आपले बस्तान कर्नाटकात बसविले व ते या ठिकाणी रातोरात गर्भलिंग चाचण्या करत आहेत. पिराचीवाडी येथील साताप्पा रोडे याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तो बोगस डॉक्टर असल्याचे पुढे आले. रोडे हा बोगस डॉक्टर असताना रुग्णांवर तो कंपौंडरच्या अनुभवाच्या जोरावर उपचार करत होता.
गर्भलिंग चाचणीसह गर्भपात करण्यामध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब पटाईत आहे. आजपर्यंत त्याच्याकडे शासनाचा एकही अधिकारी चौकशीसाठी गेला नव्हता. रोडेसारखे अनेकजण ‘बोगस डॉक्टर’ बनून राजरोस गर्भलिंग चाचण्यासह गर्भपात करीत आहेत. चायना बनावटीची सोनोग्राफी यंत्रे अवघ्या एक लाख ७० हजार रुपयांना खरेदी करून त्यावर लाखो रुपयांची कमाई हे डॉक्टर करत आहेत.
मोकाट डॉक्टर
गर्भलिंग तपासणीचे सांगली, कोल्हापूर ते कर्नाटक असे मोठे रॅकेट असून, त्यामध्ये डॉक्टर व एजंटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी गावोगावी खुलेआम डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्यांची चौकशी करून संशयास्पद हालचाली दिसल्यास उचलबांगडी करणे गरजेचे आहे. कारवाईची भीती न बाळगणारे डॉक्टर गर्भलिंग चाचण्यांबरोबरच गर्भपात करीत फिरत आहेत.
अकार्यक्षम समिती
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर शोधमोहिमेंतर्गत समिती तालुकास्तरावर स्थापन केली आहे. गावागावांत सुरू असलेल्या दवाखान्यांची व डॉक्टरांची चौकशी करण्याचे अधिकार या समितीला आहेत; परंतु ही समिती गावागावांत पोहोचलेली नाही.
जिल्ह्यातील डॉक्टरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. रजिस्टर नसणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. यासंबंधी शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासोबत बैठक झाली.
- डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर.