आॅनलाइन फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांचा आज एक दिवसीय संप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 05:57 AM2018-09-28T05:57:42+5:302018-09-28T05:58:10+5:30
आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट्स या संघटनेने शुक्रवारी देशभर औषध विक्रेत्यांचा एक दिवसीय संप पुकारला आहे. या संपात अखिल भारतीय संघटनेची संलग्न संस्था द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनही सामील होणार आहे.
मुंबई : आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट्स या संघटनेने शुक्रवारी देशभर औषध विक्रेत्यांचा एक दिवसीय संप पुकारला आहे. या संपात अखिल भारतीय संघटनेची संलग्न संस्था द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनही सामील होणार आहे.
संप काळात राज्यात औषधांचा तुटवडा भासू नये, म्हणून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने वांद्रे येथील मुख्यालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य आॅनलाइन औषध विक्री होत असून, त्याचा फटका औधषविक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने अशा विक्रीस विरोध केला आहे. ही विक्री बंद व्हावी यासाठी संघटनेने याआधी दोनदा बंद पुकारला होता. परंतु केंद्र सरकारने दखल न घेतल्याने शुक्रवारी पुन्हा आंदोलनाचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. या संपात आठ लाख विक्रेते सहभागी होतील. या संपात महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन आणि ग्रीन क्रॉस फाउंडेशन फॉर फार्मासिस्ट संघटनांनी सहभागी होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
तक्रार करण्याची सोय उपलब्ध
औषधांच्या तुटवड्याबाबत काही अडचणी आल्यास एफडीएच्या मुख्यालयात विशेष कक्ष आहे. शिवाय, यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावरही तक्रार करण्याची सोय आहे. तसेच, राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त कार्यालये व जिल्हास्तरीय सहायक आयुक्त कार्यालयांत प्राधान्याने नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.