बाळाच्या नाळेपासून औषधांचे उत्पादन! आरोप सरकारने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:53 AM2019-06-25T04:53:01+5:302019-06-25T04:54:05+5:30
राज्यात बाळाच्या नाळेचा वापर करून औषध उत्पादन करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देण्यात आलेला नाही.
मुंबई : राज्यात बाळाच्या नाळेचा वापर करून औषध उत्पादन करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देण्यात आलेला नाही. तसेच बाळाच्या नाळेपासून रक्त साठवून उपचार पद्धती केली जाते ती फक्त बाळ व त्याच्या नातेवाईकांसाठी असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय होण्याची शक्यता नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानसभेत दिली.
शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी मुंबईसह राज्यात असलेली प्रसूतिगृहे पालकांची परवानगी न घेता बाळाची नाळ खाजगी औषधी निर्मिती कंपन्यांना विक्री करण्याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास येरावार म्हणाले, बाळाच्या नाळेतील रक्त साठवून त्याचा वापर बाळासाठी किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन कोर्ड ब्लड बँक या अंतर्गत परवाना मंजूर करते. बाळाच्या नाळेपासून औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या राज्यात नाहीत.
औषधी उत्पादन करण्यासाठी तसेच इतर औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्च माल शासकीय यंत्रणेद्वारे संचालित ३२ आरोग्य संस्थांकडून प्राप्त करण्याची परवानगी पश्चिम बंगाल सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेली आहे. या कंपन्यांचे परवाने वैध आहेत.
असा प्रकार घडत नाही
मुंबईसह राज्यातील कोणत्याही रूग्णालयातील प्रसुतीगृहातून ही उत्पादक संस्था बाळाची नाळ औषधी निर्मितीकरीता खरेदी करत नाही.
तसेच, राज्यातील कोणत्याही रूग्णालयातून बाळाच्या नाळेचे संकलन करून त्याचा पुरवठा औषध उत्पादन करणाºया कंपन्यांना करण्यात आल्याची घटना घडलेली नाही, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.