राज्यातील ९ रुग्णालयांत औषध भांडारांची दुरवस्था
By Admin | Published: October 19, 2016 06:03 AM2016-10-19T06:03:41+5:302016-10-19T06:03:41+5:30
राज्यभरातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत नेहमीच रुग्णांच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल असतात.
मुंबई : राज्यभरातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत नेहमीच रुग्णांच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल असतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णालयांच्या औषध भांडारातूनच औषधे दिली जातात. पण, अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील ११ शासकीय रुग्णालयांची तपासणी केली असता फक्त दोन रुग्णालयांमध्ये औषध भांडारांची स्थिती योग्य असल्याचे आढळून आले आहे.
राज्यातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांतील औषध भांडारांमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १४ आॅक्टोबर रोजी राज्यभरातील शासकीय, महापालिका रुग्णालयातील औषध भांडारांची तपासणी केली असता त्यांची दुरवस्था अथवा दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव समोर आले. औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयात फार्मासिस्टचे पद मंजूर नाही. पण, रुग्णालयात २ फार्मासिस्ट प्रतिनियुक्तीवर काम करीत असल्याचे आढळले. कर्करोगाची काही औषधे ही २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवणे आवश्यक असते. पण, तशी सुविधा उपलब्ध नसल्याने सामान्य तापमानात ठेवल्याचे आढळून आले. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणि पुण्याच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात नियमांचे पालन होत असल्याचे आढळून आले आहे.
रुग्णालयांच्या औषध भांडारांची तपासणी केल्यावर आढळून आलेल्या त्रुटी संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत. या त्रुटी सुधारण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही सांगण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त (दक्षता) हरीश बैजल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>औषध साठवणूक आणि खरेदीसाठी असलेले नियम
रुग्णास औषधे फार्मासिस्टच्या वैयक्तिक देखरेखीखाली वितरित करावीत.
औषधे त्यांच्या लेबलवरील नमूद तापमानात साठवावीत.
औषधांची खरेदी परवानेधारक उत्पादक आणि वितरकांकडून करावी.
रुग्णालयांनी औषधाची खरेदी आणि वितरणाचा रेकॉर्ड ठेवावा.
मुदतबाह्य औषधांचे वितरण करू नये.
औषधाच्या लेबलवरील सूचनांचे पालन करावे.
>कोणत्या रुग्णालयांची केली तपासणी? काय आढळले?
आयएनएचएस अश्विनी नेव्ही रुग्णालय, कुलाबा
औषध भांडारात २४ लाख २४ हजार रुपये किमतीची मुदतबाह्य औषधे आढळली.
त्यात मुदतबाह्य झालेल्या १६ हजार ६४० रुपये किमतीची ६९ इंजेक्शन्स आणि ३ हजार ७५० रुपये किमतीची ३०५ इंजेक्शन्स आढळली.
शीतपेटी आणि रॅक्सवर नियमित औषधांसमवेत साठा केला होता. मुदतबाह्य औषधाच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था पुरवलेली नाही.
औषध भांडारात फार्मासिस्टची नियुक्ती नाही.
औषधांचे बॉक्स रॅकवर न ठेवता जमिनीवर ठेवलेले आढळले.
काही औषधांचा साठा हा २ ते ८ डिग्री सेंटीग्रेड तापमानात करायचा होता. ही औषधे योग्य तापमानात ठेवलेली आढळली नाहीत.
सामान्य रुग्णालय, अकोला
औषध भांडाराला रॅक पुरवलेले नाहीत, त्यामुळे औषधांचे बॉक्स जमिनीवरच ठेवतात.
औषध भांडारात अस्वच्छता तसेच औषधांच्या लेबलवर नमूद तापमानानुसार औषधांची साठवणूक केली जात नाही.
प्रत्यक्ष औषधसाठा आणि अभिलेखातील नोंदीमध्ये तफावत.
ई.एस.आय.एस., नागपूर
या रुग्णालयाच्या अखत्यारीतील १२ औषध भांडारांनी औषधे उसनवार पद्धतीने वितरित केली असल्याचे आढळले.
एकाच औषधाचे, एकाच उत्पादकाचे विविध औषधी भांडारांना वेगवेगळ्या दराने औषधांची खरेदी केल्याचे आढळले.
अभिलेखात नोंदीनुसार आणि प्रत्यक्ष उपलब्ध औषधांच्या साठ्यामध्ये तफावत.
आयसोलेशन रुग्णालय, इमामपाडा, नागपूर
औषध भांडारात अस्वच्छता.
औषध भांडारात रॅक्स नसल्याने औषधांचे बॉक्सेस जमिनीवर ठेवलेले.
लेबलवर नमूद केलेल्या तापमानानुसार औषधांची साठवणूक केलेली नाही.
ग्रामीण रुग्णालय,
सुरगाणा, जि. नाशिक
थंडावा आवश्यक असणाऱ्या औषधांच्या साठवणुकीसाठी सोय नाही.
परिशिष्ट एक्स प्रवर्गातील औषधे साठविण्यास स्वतंत्र सुविधा पुरवलेली नाही.
८ सप्टेंबर २०१६पासून औषधांचा साठा व वितरणाबाबत नोंदी अद्ययावत नाहीत.
औषधांचे बॉक्स जमिनीवरच ठेवलेले; कारण रॅक्स नाहीत.
सिद्धार्थ महापालिका रुग्णालय, गोरेगाव (प.)
एकच फार्मासिस्ट दररोज सुमारे ८०० रुग्णांना औषधे वितरित करतो. इतक्या रुग्णांना एकच व्यक्ती औषध देत असल्याने औषध देण्यात चूक होण्याचा धोका.
रुग्णांना सुट्या गोळ्या देताना ग्लोवज् वापरत नाहीत.
गोळ्या कागदाच्या पुडीत बांधून दिल्या जातात. त्यावर औषधाचे नाव लिहिले जात नाही.
औषध भांडारात औषधांचे बॉक्स जमिनीवर ठेवलेले आढळले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा
औषध भांडारात सर्वत्र धूळ आणि अस्वच्छता होती.
थंडावा आवश्यक असणारी औषधे सर्वसाधारण तापमानात साठविलेली असतात.
मुदतबाह्य औषधे उत्पादक/ पुरवठादारास परत दिल्याच्या नोंदी न ठेवल्याचे आढळले.
प्रत्यक्ष औषधी साठा आणि अभिलेखातील नोंदीत तफावत
इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी
औषध भांडारात वितरणाच्या अभिलेखामध्ये औषधांचे समूह क्रमांक, मुदतबाह्य आणि उत्पादन दिनांक नमूद करत नाहीत.