औषध खरेदी घोटाळा : धुळे पालिकेनेही परत केली औषधे!
By admin | Published: April 11, 2016 02:44 AM2016-04-11T02:44:33+5:302016-04-11T02:44:33+5:30
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त औषध साठ्यापैकी लाखो रुपयांची औषधे नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडून
धुळे : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त औषध साठ्यापैकी लाखो रुपयांची औषधे नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडून धुळे महानगरपालिकेलासुद्धा २ नोव्हेंबर २०१५ ला प्राप्त झाला होती. मात्र ती परत पाठविण्यात आली होती. मागणी नोंदविलेली औषधे मात्र पालिकेला मिळाली नव्हती.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय जाधव यांच्या मागणीनंतर पुरवठ्याची चौकशी झाली. अतिरिक्त साठा पाठविण्यात आल्याने वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून तो परत पाठविण्यात आला होता, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली़ मागणी नसताना अतिरिक्त औषध साठा कसा प्राप्त झाला?
याबाबत जाधव यांनी राज्य शासनाकडे चौकशीची मागणी केली होती़ त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकाचे तसे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार तत्कालीन पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले होते़ त्यात आरोग्य उपसंचालकांकडून मागणी नसताना अधिक औषधांचा पुरवठा झाल्याचे समोर आले होते़
अतिरिक्त औषधांमध्ये प्रामुख्याने सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन, हायड्रोजन पेरोक्साईड आणि आयोडीन यांचा समावेश होता़ प्रत्येकी जवळपास १० हजार बाटल्या विनाकारण पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
धुळे महापालिकेला अतिरिक्त औषधे प्राप्त झाली होती. तत्कालीन आयुक्तांनी चौकशीचे आदेशही दिले होते़ त्यानुसार चौकशी अहवाल शासनाला सादर केला आहे़ मागणी नसताना अनेक प्रकारची औषधे पुरविण्यात आली होती. त्यामुळे ती औषधे परत पाठविण्यात आली.
- डॉ़ नामदेव भोसले,
पालिका आयुक्त