रूग्णांना पाठविलेली औषधी आरोग्यासाठी घातक!

By admin | Published: October 18, 2014 12:50 AM2014-10-18T00:50:32+5:302014-10-18T00:50:32+5:30

अकोल्यातील आयुर्वेद तज्ज्ञाकडून रूग्णांना अँलोपॅथी औषधी; प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त, कारवाईचा मार्ग मोकळा.

Drugs sent to the patients are dangerous for health! | रूग्णांना पाठविलेली औषधी आरोग्यासाठी घातक!

रूग्णांना पाठविलेली औषधी आरोग्यासाठी घातक!

Next

सचिन राऊत/ अकोला

राज्यातील विविध शहरांमध्ये रूग्णांना पाठविली जाणारी, अकोल्यातील आयुर्वेद तज्ज्ञ राजेंद्र डाबरे यांची औषधी आरोग्यासाठी घातक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुख्य डाकघरातून गत एप्रिल महिन्यात जप्त केलेल्या औषधींमधील तीन औषधींचा अहवाल अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झाला असून, त्यापैकी एक औषधी ही अँलोपॅथीची असल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे. आयुर्वेद तज्ज्ञ असूनही रूग्णांना अँलोपॅथी उपचार पद्धतीची औषधी डॉ. डाबरे यांनी दिल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांच्याविरूद्ध कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. गोरक्षण रोडवरील सिलीकॉन टॉवरमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ राजेंद्र डाबरे यांचे क्लिनीक असून, ते राज्यातील विविध भागात अँलोपॅथी औषधींचा पुरवठा करीत होते. राज्यातील विविध शहरांमध्ये असलेल्या त्यांच्या रुग्णांना महिन्यातून दोनवेळा ते डाक कार्यालयामार्फत औषधी पाठवत होते. डॉ. डाबरे यांच्या स्वाक्षरीनिशी, त्यांच्या रुग्णालयाचे शिक्के मारलेल्या पाकीटांमधून ही औषधी पाठविली जायची. डॉ. डाबरे हे आयुर्वेद तज्ज्ञ असताना, अँलोपॅथीची औषधी ते रुग्णांना पाठविण्याचे काम गत अनेक दिवसांपासून करीत होते. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर २९ एप्रिल रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी मुख्य डाक कार्यालयात छापा मारुन औषधींची ६00 पाकीटं जप्त केली होती. पाठपुराव्याअभावी तब्बल सहा महिने उशिरा अहवाल प्राप्त झाला. लोकमतने हा प्रकार उजेडात आणताच, सहापैकी तीन नमुन्यांचे अहवाल तातडीने मागविण्यात आले. त्यापैकी एक नमूना हा आरोग्यासाठी घातक अँलोपॅथी औषधींचा असल्याचे समोर आले आहे. डॉ. डाबरे हे आयुर्वेद तज्ज्ञ असताना, त्यांनी अँलोपॅथीची औषधं रूग्णांना दिल्याचे स्पष्ट झाल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे. प्रशासनाने जप्त केलेल्या औषधींचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्या नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यापैकी एका नमुन्यात अँलोपॅथीची घातक औषधी असल्याचे स्पष्ट झाले असल्याने नियमाप्रमाणे डॉ. डाबरेंवर पुढील कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एच. वाय. मेतकर यांनी कळवले.

*सहापैकी तीनच नमुन्यांचा अहवाल प्राप्त

डॉ. राजेंद्र डाबरे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या औषधीच्या साठय़ातील सहा औषधींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तीन नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी एका नमुन्यात आरोग्यासाठी घातक अँलोपॅथीची औषधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

*कारवाईचा मार्ग मोकळा

अन्न व औषध प्रशासन विभागाने डॉ. डाबरे यांचा औषधी साठा जप्त केल्यानंतर, पुढील कारवाई संथ गतीने सुरू होती. लोकमतने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर, नव्यानेच रुजु झालेले सहआयुक्त एच. वाय मेतकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्याने, आता डॉ. डाबरे यांच्याविरूद्ध पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Drugs sent to the patients are dangerous for health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.