जीव जात असतानाही औषधांची वानवा!
By admin | Published: June 16, 2014 01:03 AM2014-06-16T01:03:07+5:302014-06-16T01:03:07+5:30
रुग्णाचा जीव जात असतानाही मनोरुग्णालय औषधे उपलब्ध करून देत नाही. या अनास्थेच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे अनेक रुग्णांना औषधाविनाच मृत्यूला कवटाळावे लागत आहे. रविवारी पहाटे पुन्हा एका
पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू : मनोरुग्णालयात अनास्थेचा मेंटल ब्लॉक
सुमेध वाघमारे - नागपूर
रुग्णाचा जीव जात असतानाही मनोरुग्णालय औषधे उपलब्ध करून देत नाही. या अनास्थेच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे अनेक रुग्णांना औषधाविनाच मृत्यूला कवटाळावे लागत आहे. रविवारी पहाटे पुन्हा एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला आवश्यक औषधे मनोरुग्णालयाने उपलब्ध करून न दिल्याने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी मेडिकलने कॅन्सरपीडित मनोरुग्ण बिन्ना यांना केमोथेरपी देऊन सुटी दिली. ही थेरपी मेडिकलने स्वत:कडून दिली, उर्वरित चार-पाच थेरपीचा खर्च मनोरुग्णालयाला उचलायचा आहे. रुग्णालय हा खर्च करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी पहाटे मृत्यू झालेल्या मनोरुग्णाचे नाव दाजी मुक्का (८०) आहे. १९६० मध्ये पोलिसांनी त्यांना रुग्णालयात आणले होते. त्यावेळी त्यांचे वय २२ ते २५ च्या दरम्यान असेल. तेव्हापासून ते रुग्णालयाच्या चार भिंतीत बंदिस्त आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांना निमोनिया झाला होता. श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे मुक्का यांना मेडिकलमध्ये भरती केले. चार दिवसांपासून ते मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. रविवार पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुक्का अतिदक्षता विभागात उपचार घेत असतानाही डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे मनोरुग्णालयाने उपलब्ध करून दिली नाहीत. विशेषत: डॉक्टरांनी काही अॅण्टीबॉयटीक बाहेरून विकत घेण्यास सांगितले होते. परंतु कुणाचेच याकडे लक्ष नव्हते.
रुग्ण कल्याण समितीचा उपयोगच नाही
रुग्णांवरील औषधोपचार किंवा एखाद्या खासगी चाचणीच्या खर्चासाठी मनोरुग्णालयांमध्ये रुग्ण कल्याण समिती आहे. तीन महिन्यातून एकदा होणाऱ्या समितीच्या बैठकीत झालेला किंवा होणारा खर्च मंजूर केला जातो. परंतु मागील वर्षभरात समितीची बैठकच झालेली नाही. याशिवाय पब्लिक लेजर अकाऊंटमधूनही (पीएलए) पैसे उपलब्ध करून देणे शक्य आहे. याला फक्त आरोग्य विभागाच्या संचालकाची मंजुरी हवी असते. परंतु लालफितीची मनमानी आणि अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे औषधांची वानवा आहे.