Sameer Wankhede vs Nawab Malik: रेस्टॉरंटच्या जेवणासोबत क्रूझवर ड्रग्ज पोहोचविले गेले; नवाब मलिकांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 09:43 AM2021-10-31T09:43:24+5:302021-10-31T09:44:04+5:30
Aryan Khan Drug Case: वानखेडेंचा खरा चेहरा लोकांसमोर उघड करणार, प्रसिद्धीसाठीच आर्यनवर कारवाई : नवाब मलिक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ड्रग्जप्रकरणी क्रूझवर कारवाई करताना एनसीबीचे समीर वानखेडे यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत न घेता स्वत: तयार केलेल्या प्रायव्हेट आर्मीचा उपयोग केला. ही बाबसुद्धा भविष्यात सिद्ध करून वानखेडेंचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करणार असल्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी येथे स्पष्ट केले.
आर्यन खानला एनसीबीने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. वानखेडे यांनी केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीच हा सर्व खटाटोप केला. स्वत:ची प्रायव्हेट आर्मी तयार करून दहशत निर्माण केली. त्यांनी यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटींना बोगस प्रकरणांत अडकवले. आर्यनवर कारवाई केली, त्या दिवसापासून मी हे फेक प्रकरण असल्याचे म्हटले होते. आर्यनला यापूर्वीच जामीन मिळायला हवा होता. खूप उशिराने जामीन मिळणे म्हणजे हा आर्यनवर अन्यायच होय. आर्यन प्रकरणातील सत्य निश्चितपणे सर्वांसमोर येईल, असे ते म्हणाले.
रेस्टॉरंटच्या जेवणासोबतच असे गेले क्रूझवर ड्रग्ज
दरम्यान, क्रूझवरील ड्रग्ज पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेले त्यातूनच ड्रग्ज गेले होते. याबाबतचे सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसे अडकवण्यात आले, हे सांगितले आहे. या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल, असेही ते म्हणाले.
नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो; सर्वसामान्य माणूस वानखेडे यांच्या पाठीशी - चंद्रकांत पाटील
तळेगाव दाभाडे (पुणे) : समीर वानखेडे हा माझा जावई नाही आणि भाजपचा देखील जावई नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे सुरू आहे ते सुरू राहावे; परंतु सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे उभा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येथे म्हणाले. नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
nमावळातील तळेगाव दाभाडे येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. त्यावेळी नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात सुरू असलेल्या वाक्युद्धाविषयी पाटील यांना विचारले असता, त्यांनी मलिकांवर टीका केली. यावेळी पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्य माणूस
वानखेडे यांच्या मागे उभा आहे. मलिकांनी जास्त परीक्षा घेऊ नये. कारण समाज हा नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या पाठीशी असतो हे ध्यानात ठेवावं.’ मलिक दररोज भाजपवर टीका करीत आहेत, यावर पाटील म्हणाले, ‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो.’