रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, पालिकेने बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:52 AM2017-07-20T02:52:59+5:302017-07-20T02:52:59+5:30

रेडिओ जॉकी मलिष्काचे मुंबईच्या खड्ड्यांवरील गाणे शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे. त्यामुळे तिच्यावर पाचशे कोटींचा दावा ठोकण्याची मागणी शिवसेनेने

Drugy larvae of the Radio Jockey Mallika's house, the notice issued by the corporation | रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, पालिकेने बजावली नोटीस

रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, पालिकेने बजावली नोटीस

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेडिओ जॉकी मलिष्काचे मुंबईच्या खड्ड्यांवरील गाणे शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे. त्यामुळे तिच्यावर पाचशे कोटींचा दावा ठोकण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर आज लगेच तिच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा साक्षात्कार पालिकेला झाला आहे. या प्रकरणी पालिकेने मलिष्काला नोटीसही बजावली आहे. तसेच तिचे एखादे बेकायदा बांधकामही असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. त्यामुळे मलिष्का ही पालिका आणि शिवसेनेच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले.
रेडिओ जॉकी मलिष्काचे ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सत्तेवरील शिवसेनेचे धाबे दणाणले. मलिष्काला खोटे पाडण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले. या गाण्यामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने मलिष्का आणि त्या रेडिओ चॅनेलवर कारवाईची मागणी शिवसेनेने आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली आहे. मलिष्का वांद्रे पश्चिमेकडील सनराईज इमारतीत राहते. एच वेस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी या इमारतीत तपासणी केली. तेव्हा तिची आई लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सूडबुद्धीने एका दिवसात मलिष्काचे घर शोधून तिच्या घरात ‘डेंग्यू’प्रकरणी तिच्यावर कारवाई केल्याचा आरोप भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने केला.

भाजपाचा टोला
पालिकेने सूडबुद्धीने उत्तर द्यायची गरज नव्हती, मुंबईत खड्डे पडल्याने अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. अशात प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवून उत्तर द्यायला हवे होते. पालिका प्रशासनावर टीका होत असताना शिवसेना ही टीका आपल्यावर का घेते? असा टोला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी लगावला आहे. व्यक्तिस्वातंत्र्य असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या लोकांना टार्गेट करू नये, असेही त्यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

वृत्तपत्रांनाही
नोटीस देणार का?
रस्ते खराब असल्याचे
मत मलिष्काने मांडले असताना तिच्यावर दबाव आणणे चुकीचे आहे. लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांतून टीका केली जाते, मग वृत्तपत्रांनाही नोटीस देणार का, असा प्रश्न उपस्थित करत मुंबईकरांचे हाल होत आहेत ते सुधारा, असा टोमणा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मारला.

अशी झाली फजिती
डेंग्यूच्या अळ्या सापडल्या म्हणून पालिकेने नोटीस पाठविलेल्या घरात मलिष्का राहतच नसल्याचे उजेडात आले. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या शिवसेनेने यूटर्न घेतला आहे. पालिकेने मलिष्काच्या विरोधात नव्हे, तर आईच्या घरावर कारवाई केली आहे. मलिष्काला काही तक्रार होती तर तिने पालिकेकडे किंवा आयुक्तांकडे करायला हवी होती. विशेष म्हणजे डेंग्यू प्रकरणी कारवाई झालेली मलिष्का ही पहिली सेलिब्रिटी नाही. याआधीही अभिनेता ऋषी कपूरवर कारवाई झाली आहे.

सेनेने ओढवून घेतला नसता वाद
- मलिष्काच्या घरात अळ्या सापडल्या ‘गोलगोल’, मलिष्काने शिवसेनेची केली ‘पोलखोल’, अशा शब्दांत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली. या अळ्या महापालिकेला अगोदर का नाही सापडल्या, असा सवाल करत हा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा व्यंगचित्रातून विडंबन केले. परंतु त्यावर कधी असे राजकारण झाले नाही. शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिकवणीचा विसर पडला आहे. मुद्दाम एखाद्याला असा त्रास देणे सेनेला शोभत नाही, असा टोला मनसेने लगावला.

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मलिष्काप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून सेनेची खिल्ली उडवली. ‘मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!’, असे ट्विट करत राणे यांनी मलिष्काला आपला पाठिंबा जाहीर केला. तर, मुंबईकरांना रोज ज्या गंभीर विषयांचा ‘सामना’ करावा लागतो त्यावर मलिष्काने व्यंगात्मक ‘मार्मिक’ टीका केली. ते तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे विधान मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केले. या वादानंतर मलिष्काच्या घरी धाड टाकून डेंग्यूच्या अळ्या शोधण्याचा प्रकार चुकीचा असून या प्रकरणी आयुक्त आणि वॉर्ड अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे ते म्हणाले.

एफएम चॅनलवर विशेष शो : शिवसेनेने आरजे मलिष्काला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताच बुधवारी मुंबईतील सर्वच एफएम रेडिओ चॅनलनी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर विशेष शो मोहीम चालविली. या शोंच्या माध्यमातून त्यांनी मलिष्काला आपला पाठिंबा दिला आहे.

- रेडिओ जॉकी (आरजे) मलिष्काने सोशल मीडियावर शेअर केलेका ‘तो’ व्हिडीओ केवळ शिवसेनेच्या आततायीपणामुळे राजकीय मुद्दा बनत चालल्याचे चित्र आहे. मलिष्कामुळे शिवसेनेचीच पोलखोल झाल्याचे सांगत आता मनसे, काँग्रेस आणि भाजपानेही या प्रश्नात उडी घेतली आहे.

Web Title: Drugy larvae of the Radio Jockey Mallika's house, the notice issued by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.