कोरोनामुळे थांबवली ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई : पोलीस महासंचालकांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:47 PM2020-03-17T16:47:08+5:302020-03-17T16:48:39+5:30
कोरोनाचा विषाणू ड्रंक अँड ड्राइव्हच्या माध्यमातून अनेकांपर्यंत प्रसारित होऊ शकतो़ हा धोका
मुंबई : महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, म्हणून पोलिसांनी आणखी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईस अडथळा आला आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई करताना अर्थात ब्रीथ अॅनलायझरचा वापर पोलिसांनी करू नये, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आला आहे. पोलिसांना सोमवारी रात्री हे आदेश मिळाले आहेत.
कोरोनाला महामारी असे घोषित केले गेले आहे़. तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. ड्रंक अँड डाइव्ह केसेस करताना वाहतूक शाखेचा पोलीस एकाच ब्रीथ अॅनलायझरमधून दिवसभरात अनेकांची तपासणी करतो. एकाच्या तोंडासमोरचे उपकरण पोलीस दुसऱ्याच्या, तिसऱ्याच्या असे अनेकांच्या तोंडासमोर धरतो. तसेच तो हे उपकरण स्वत:जवळ बाळगत असतो. त्यांना त्यात फूक मारायला सांगतात. यात जर एखादा कोरोनाबाधित असेल तर त्यातून कोरोनाचा विषाणू ड्रंक अँड ड्राइव्हच्या माध्यमातून अनेकांपर्यंत प्रसारित होऊ शकतो़ हा धोका लक्षात आल्याने पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून सोमवारी राज्यातील सर्व पोलीसप्रमुखांना आदेश पाठविण्यात आले असून, ब्रीथ अॅनलायझरचा वापर करणे थांबविण्यास सांगितले आहे.
वाहतूक शाखेने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी असा वाहनचालक दारू प्यायलेला आढळून आल्यास त्याची आवश्यकता वाटल्यास मेडिकल करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.