मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला फरफटत नेले
By admin | Published: September 3, 2016 03:10 PM2016-09-03T15:10:57+5:302016-09-03T15:48:04+5:30
मद्यपी चालकाने वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरटफटत नेल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ३ - हेल्मेट घातले नाही म्हणून अडवणारे वाहूतक पोलिस विलास शिंदे यांच्यावर बांबूने प्रहार करून त्यांचा जीव गेल्याची घटना अद्याप ताजी असतानाच ठाण्यात एका मद्यपी चालकाने वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरटफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र तेथील नागरिकांना प्रसंगावधान दाखवत त्या कारचालकाला पकडले व मोठी दुर्घटना होण्यापासून रोखले. या घटनेत हवालदार नरसिंग महापुरे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महापुरे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तीन हात नाका येथे कर्तव्य बजावत असताना रस्त्याच्या उलट्या बाजूने भरधाव वेगाने कार जात असल्याचे दिसले. त्यांनी कार चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला मात्र मद्यपी कार चालक योगेश भांबरेने गाडी न थांबवता तशीच पुढे नेली व महापुरे यांना उडवले. त्यामुळे महापुरे बोनेटवर पडले, एवढे होऊनही गाडी न थांबता तशीच पुढे गेली व महापुरेही अर्धा किलोमीटर पुढे फरफटत गेले. कारचालकाने गाडी वाकडी तिकडी करत त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत कार चालकाला रोखले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महापुरे यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर ठाणेकरांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत संतापाचे वातावरण आहे.