विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2016 06:20 PM2016-08-07T18:20:28+5:302016-08-07T22:23:33+5:30

मित्रांसमवेत पोहायला गेलेला सुमित संजय कुलकर्णी (१५, रा. माळी गल्ली, पाटोदा) हा रविवारी सकाळी ११ वाजता एका विहिरीत बुडाला.

A drunken student drowning on the well | विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

बीड, दि. 7-  मित्रांसमवेत पोहायला गेलेला सुमित संजय कुलकर्णी (१५, रा. माळी गल्ली, पाटोदा) हा रविवारी सकाळी ११ वाजता एका विहिरीत बुडाला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता.
सुमित पाटोद्यातील भामेश्वर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. रविवारी सकाळी ११ वाजता चार मित्रांसोबत तो घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दहा ते बारा शेतकऱ्यांच्या सार्वजनिक विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. इतर मित्रांनी विहिरीत उड्या टाकल्यानंतर त्यालाही मोह आवरता आला नाही. त्याने देखील धाडस केले; मात्र उडी टाकल्यानंतर पाण्यातून बाहेर आलाच नाही.
तो बुडाल्याचे लक्षात आल्यावर चारही मित्रांनी विहिरीबाहेर येत आरडाओरड करून गावात खबर दिली. त्यानंतर महिला-पुरुष विहिरीकडे धावले. विहीर पन्नास फूट खोल असून, जवळून मांजरा नदी गेल्याने त्यात भरपूर पाणी आहे. मृतदेह तळाशी गेल्याने गाळात रुतला असण्याची शंका व्यक्त होत आहे. अद्यापही त्याचा शोध लागत नसल्याने नातेवाईक, ग्रामस्थ विहिरीजवळ तळ ठोकून आहेत. 
सात विद्युत पंपांद्वारे उपसा
सात विद्युत पंपांद्वारे विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू आहे. उपसलेले पाणी नदीत सोडण्यात आले आहे; मात्र पाण्याचा प्रवाह कमी होत नसल्यामुळे त्याच्या शोधकार्यात अडथळा येत आहे. घटनास्थळी पाटोदा ठाण्याचे निरीक्षक आदिनाथ रायकर यांनी भेट दिली. जमादार जालिंदर शेळके हे प्रयत्नशील आहेत. सुमित कुलकर्णी हा अभ्यासात हुशार होता. सकाळी जेवण न करताच तो घराबाहेर पडला. आई पंचमीच्या स्वयंपाकात व्यस्त असतानाच तो बुडाल्याची बातमी आली. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी टाहो फोडला. त्याचा मृतदेह आढळून येत नसल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे. पंचमीच्या सणावर दु:खाचे सावट पसरले आहे.

Web Title: A drunken student drowning on the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.