दुधाला अपप्रवृत्तींचे विरजण

By admin | Published: June 25, 2017 01:51 AM2017-06-25T01:51:43+5:302017-06-25T01:51:43+5:30

शेतीला पूरक उद्योग म्हणून महाराष्ट्रात दुधाळ जनावरांचे संगोपन सुरू झाले. दूध संकलन वाढत गेल्यानंतर, शासकीय संस्थांना सहकारी दूध संघांची जोड मिळाली

Dry milk | दुधाला अपप्रवृत्तींचे विरजण

दुधाला अपप्रवृत्तींचे विरजण

Next

शेतीला पूरक उद्योग म्हणून महाराष्ट्रात दुधाळ जनावरांचे संगोपन सुरू झाले. दूध संकलन वाढत गेल्यानंतर, शासकीय संस्थांना सहकारी दूध संघांची जोड मिळाली. महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळू लागल्याने, शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे खेळू लागले. मात्र, हुकमी उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकांनी स्वत:चे खासगी दूध संघ सुरू केले. स्पर्धेचे युग, भ्रष्ट प्रवृती, यामुळे सहकारी दूध संस्थांना घरघर लागली. सध्या राज्यात शासकीय दूध संस्था व ‘महानंद’ची स्थिती फारशी चांगली नाही. सरकारने नुकतेच दूधखरेदीचे दर वाढविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक, शासकीय संस्था, सहकारी व खासगी संघ, सरकारी योजना व या क्षेत्रातील प्रश्न-समस्यांचा घेतलेला हा सर्वंकष आढावा.

कोल्हापूरचा बोलबाला!
कोल्हापूर : राज्य सरकारच्या दूधखरेदी दरापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांचा दर नेहमीच जास्त राहिला आहे. उत्पन्नातील ८१ टक्के वाटा दूध उत्पादक शेतकऱ्यांना देणारा ‘गोकुळ’ हा एकमेव संघ आहे.
जिल्ह्यात शेतकरी चळवळीचा वचक असल्याने उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळतो. ‘गोकुळ’, ‘वारणा’, ‘स्वाभिमानी’, ‘शाहू’ या प्रमुख दूध संघासह इतर छोट्या डेअऱ्यांच्या माध्यमातून रोज २० लाख लीटर दुधाचे उत्पादन होते. ११ लाख लीटर दूध एकट्या ‘गोकुळ’कडे येते. राज्य सरकारने दूधखरेदी दरात वाढ करताना विक्री दरात वाढ न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दूध संघांना फटका बसणार आहे. म्हैस दूधखरेदी दरात वाढ करावी लागली नसली, तरी गाईच्या दुधात प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ केल्याने, दिवसाला सुमारे २० लाखांचा फटका संघांना बसणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलनाच्या माध्यमातून वर्षाला ३ हजार कोटींची उलाढाल होते. साखर उद्योगाच्या बरोबरीने दूध व्यवसायाची उलाढाल झाल्याने ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आली आहे.

मराठवाड्यात चारा व पाणीटंचाई
मराठवाड्यात पाच लाख ८० हजार लीटर दूध संकलन होते. त्यात सर्वाधिक दररोज साडेतीन लाख लीटर दूध संकलन उस्मानाबाद जिल्ह्यात होते. मराठवाड्यात दुष्काळाच्या काळात चारा व पाणीटंचाईचा फटका बसतो. येथील दूध उत्पादकाला लीटरमागे ३० ते ३१ रुपये मिळाले, तरच व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो.

औरंगाबादला एक लाख ९० हजार लीटर संकलन होते. लातूर जिल्ह्यात १५६ सोसायटी अंतर्गत १३ हजार उत्पादकांपैकी साडेचार हजार दूध उत्पादक महानंद व राज्य शासनाच्या केंद्रांवर दूध विक्रीसाठी पाठवितात.

बीड जिल्ह्यात एक लाखांहून जास्त दूध उत्पादकांना शासकीय निर्णयाचा लाभ होणार आहे. जिल्ह्यात दररोज तीन लाख लीटर दूध संकलन होते. बीड जिल्ह्यात धवलक्रांती करणारा तालुका म्हणून आष्टी नावारूपाला आला. निम्मे संकलन या तालुक्यातून होते, परंतु दुष्काळाचा फटका बसल्याने, २ लाख लीटरवरून हे संकलन ८५ हजार लीटरवर येऊन ठेपले.

दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने परभणीतील शासकीय दूध शीतकरण केंद्रात दुधाचे संकलन वाढण्याची शक्यता आहे. सध्या १७ हजार लीटर संकलन होते. जिल्ह्यात १३६ सहकारी दूध संस्था बंद आहेत. पॅकबंद दुधाची मोठी उलाढाल होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय चालतो़ त्यामुळे गावोगाव संकलन केंद्र निर्माण झाले आहेत़
जालना जिल्ह्यात
शासकीय व सहकारी केंद्राच्या माध्यमातून वार्षिक १२ कोटींची उलाढाल होते.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन मुळातच कमी आहे. दोन्ही जिल्ह्यांत ९0 टक्क्यांहून अधिक दूधविक्री पश्चिम महाराष्ट्रातील संघांची होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२० दूध संस्था आहेत. ५० अवसायनात गेल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण केंद्रावर सद्यस्थितीत एक हजार लीटर, तर रत्नागिरीमध्ये ३ हजार ५०० लीटर दूध संकलित होते.


सातारा जिल्ह्यातील ३५२ सहकारी दूध संस्था, ७ सहकारी दूध संघ, तसेच इतर काही खासगी दूध संस्थांमार्फत दररोज १५ लाख लीटर संकलन होते.

सांगली जिल्ह्यात खासगी, सहकारी, मल्टिस्टेट असे २५ नोंदणीकृत दूधसंघ आहेत. त्यातील २३ कार्यरत आहेत. दररोज १५ लाख लीटर दुधाचे संकलन होत आहे. जिल्ह्यात दररोजची साधारण ५० कोटींची उलाढाल आहे.

खान्देशात सर्वाधिक
साडेपाच लाख लीटर दूध संकलन जळगाव जिल्ह्यात होते. धुळे जिल्ह्यात एक लाख ३० हजार तर नंदुरबार जिल्ह्यात ८० हजार लीटर दूध संकलन होते. जळगाव जिल्ह्यात ४०० सहकारी संस्था आहेत. मध्यस्थ दूध उत्पादक दरवर्षी बिनव्याजी वित्तपुरवठा (आगाऊ रक्कम म्हणून) करतात. त्यामुळे अनेक दूध उत्पादक मध्यस्थांशी जोडले गेले आहेत, पण त्यांना दूध संघाच्या तुलनेत कमी दर मिळतात.

सोलापूर जिल्ह्यात खासगी दूध प्रकल्पांच्या संख्येत, तसेच दूध संकलनातही वाढ होत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने गाईच्या दुधाचे संकलन केले जाते. जिल्हा सहकारी, शिवामृत, लोकमंगल मल्टिस्टेट, तसेच खासगी असे ३० ते ३५ संघ आहेत. मे २०१६ मध्ये जिल्ह्याचे प्रतिदिन दूध संकलन ११.४८ लाखांच्या जवळपास होते. यंदा मे २०१७ मध्ये प्रतिदिन १२ लाख ५६,३६ लीटर इतके दूध संकलन झाले आहे. मात्र, सहकारी संघाच्या संकलनात ९८ हजार लीटरने घट झाली.

नाशिकमध्ये गुजरात संघांचे प्राबल्य
नाशिक जिल्ह्यात दररोज
सुमारे २ लाख ९७ हजार लीटर दूध संकलन होते. त्यातील दीड लाख लीटर दुधाचे संकलन गुजरात राज्यातील प्रमुख तीन-चार दूध संघ करतात. गुजरात दूध संघांकडून वेळेवर पैसे दिले जातात.
मालेगावमध्ये गुजरातमधील पंचमहाल जिल्हा दूध उत्पादक संघ, गोंदे (ता. इगतपुरी) येथे सुरत जिल्हा दूध संघ, लखमापूर (दिंडोरी) व करंजवण (दिंडोरी) येथे बलसाड जिल्हा दूध संघाकडून संकलन केले जाते. नाशिक जिल्हा सहकारी दूध संघाकडून अत्यल्प म्हणजे २,२०० लीटर दूध संकलन केले जाते.

अकोल्यात वार्षिक दोन
कोटींची उलाढाल होते. सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत दररोज ३ हजार लीटर दुधाचा पुरवठा होतो. सध्या ३६ प्राथमिक सहकारी दूध संस्था आहेत. नागपूरमध्ये साडेपाच लाख दूध संकलन होते. जिल्ह्यात सहकारी १ व खासगी ७ दूध संघ आहेत. शासनाचा जिल्हा दूधसंघ डबघाईस आला, परंतु खासगी दूध संस्था नफ्यात असल्याचे चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यात २१ हजार २०० लीटर दुधाचे संकलन होते. जिल्ह्यात तीन खासगी डेअरी असून, तेथे अधिक खरेदी होते. जिल्हा संघाचे संकलन जवळपास बंद आहे.

Web Title: Dry milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.