वळवाच्या पावसाने भातपेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 01:08 AM2017-06-05T01:08:10+5:302017-06-05T01:08:10+5:30

भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाटघर धरणभागात मागील आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसामुळे भाताच्या पेरण्या झाल्या आहेत.

Dry rain full of Bhayaparanya | वळवाच्या पावसाने भातपेरण्या पूर्ण

वळवाच्या पावसाने भातपेरण्या पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाटघर धरणभागात मागील आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसामुळे भाताच्या पेरण्या झाल्या आहेत. तर मागील दोन दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसाने नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या पेरण्या सुरु झाल्या आहे. अजून दमदार पावसाची गरज असल्याने काही ठिकाणच्या पेरण्या रखडल्या आहेत. भोर शहरातील खते व बियाणांच्या दुकानात बी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी एक गर्दी केली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात वळवाचे दोन-तीन दमदार पाऊस झाल्यावर रोहिणी नक्षत्रावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवर भाताच्या बियांची पेरणी केली जाते. मात्र या वेळी एप्रिल आणि मे महिन्यात वळवाचे पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या १५ दिवस पुढे गेल्या आहेत. तर भोरपासून सुमारे ५५ किलोमीटरवर असलेल्या चांदवणे, बोपे, कुंबळे, खुलशी, गृहिणी, भुतोंडे, डेरे, मळे, कुरुंजी, कांबरे खुर्द-बुद्रुक या भागांत मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने भाताच्या बियांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात प्रामुख्याने इंद्रायणी बियांची ९० टक्के पेरणी केल्याचे भुतोंडे येथील शेतकरी भगवान कंक यांनी सांगितले.
नीरा देवघर भागात वळवाचा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताच्या धूळवाफेवरील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र एक जूनला झालेल्या पावसामुळे हिर्डोशी परिसरात काही ठिकाणी शेतकरी पेरणी करण्यात आली आहे. तर याच भागातील काही ठिकाणच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. वीसगाव व आंबवडे
खोऱ्यात खाचरांची नांगरणी, कुळवणी ही पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात दमदार पाऊस झाल्यावर भाताच्या पेरण्या जोरात सुरु होतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.
भोर तालुक्यात खरिपाची १५५ गावे असून पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात बाजरी, ज्वारी, तूर, उडीद भुईमूग, सोयाबीन, वरई, नाचणी ही पिके घेत असली तरी भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. त्यामुळे भाताचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी दुकानात एकच गर्दी करीत आहेत. यात प्रामुख्याने इंद्रायणी, रत्नागिरी बासमती, सोनम, कोळंबा तामसाळ इंडम, पार्वती, कर्जत १८४ आंबेमोहोर या जातींच्या बियाणांचा समावेश असून तालुक्यात खाण्यास चविष्ठ आणि सुवासिक वास यामुळे इंद्रायणीच्या बियाला सर्वाधिक मागणी आहे.
>फलक लावावा
औषधे, खते व बी-बियाणांच्या दुकानासमोरील भागात बियाणे व खतांची किंमत दर्शवणारा फलक लावावा; अन्यथा दुकानदारांचे परवाने रद्द करू, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने संबंधित दुकानदारांना दिल्या होत्या. मात्र कोणत्याच दुकानासमोर खते, बियाणे व औषधांची किंमत दाखवणारे फलक लावलेले नाहीत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार?

Web Title: Dry rain full of Bhayaparanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.