डीएसके वाँटेड! आर्थिक गुन्हे शाखेने दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:21 AM2017-12-21T03:21:24+5:302017-12-21T03:21:40+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ते ‘वाँटेड’ आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ते ‘वाँटेड’ आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.
गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अनेक सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा दिलेला नाही. डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने देणीदारांची रक्कम कशी देणार, याची माहिती देण्यास तसेच विकता येणाºया मालमत्तांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर डीएसकेंनी १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांनी रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाने पोलिसांना नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. परिणामी डीएसकेंना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील म्हणाले की, डीएसकेंचा शोध घेत आहोत. शहरातील काही ठिकाणी पोलिसांनी त्यांचा तपास केला. मात्र, ते शहरात नसल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध सुरु असून, ते पोलिसांसाठी वाँटेड आहेत.