ठेकेदारांच्या फायद्यासाठी फुगवला ‘डीएसआर’
By admin | Published: June 13, 2016 01:07 AM2016-06-13T01:07:56+5:302016-06-13T01:07:56+5:30
डीएसआर ठेकेदाराच्या फायद्यासाठी फुगविला जात असल्याचे उजेडात आले आहे.
पुणे : महापालिकेला विविध कामांसाठी वर्षभर खरेदी कराव्या लागणाऱ्या विविध वस्तूंच्या बाजारातील दराचा आढावा घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तयार केले जाणारे डीएसआर ठेकेदाराच्या फायद्यासाठी फुगविला जात असल्याचे उजेडात आले आहे. बाजारातील किमती आणि या डीएसआरमधील किमतीमध्ये मोठी तफावत असल्याने पालिकेला दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या बाजूने, पदपथावर बसविण्यात आलेले बोलार्ड (पदपथ व रस्त्याच्या बाजूने उभारले जाणारे स्टीलचे छोटे खांब) स्टील बेंचेस यांच्या डीएसआरमधील किमती व प्रत्यक्ष बाजारातील किमती यामध्ये मोठी तफावत असल्याचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी पुराव्यानिशी मुख्यसभेत उजेडात आणले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या डीएसआरच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१ एप्रिलपासून नवीन अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या विविध विभागांकडून डीएसआर तयार केला जातो. त्यामध्ये पालिकेला वर्षभर लागणारे डांबर, खडी, मुरूम, बेचेंस, बकेट आदी असंख्य वस्तूंच्या बाजारभावाचा मार्चअखेरीस आढावा घेतला जातो. बाजारभावातील किमतींचा सखोल अभ्यास करून डीएसआर तयार होतो. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसआर तयार होत असल्याने, ते अत्यंत विश्वासार्हय मानले जातात. या डीएसआरवरच पुढील इस्टिमेट व टेंडर प्रक्रिया अवलंबून असते.
एखाद्या विकासकामासाठी किती खर्च येणार आहे, याचा रिपोर्ट या डीएसआरच्या आधारावरच तयार केला जातो. त्यानुसार ठेकेदारांकडून टेंडर भरले जातात. या डीएसआर मधील किमती कशाप्रकारे प्रचंड प्रमाणात फुगविल्या जात असल्याचे बोलार्ड व स्टील बेंचेसच्या खरेदीच्या निमित्ताने समोर आले आहे.
महापालिकेच्या वतीने २०१४-१५; तसेच २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात बोलार्ड, स्टील बेंचेस याची खरेदी करण्यात आली आहे. डीएसआरमध्ये या एका बोलार्डच किंमत ७ हजार ४५० रुपये तर, स्टीलच्या बेंचची किंमत १६ हजार इतकी दाखविण्यात आली. नगरसेवक अविनाश बागवे यांना या दराबाबत शंका आल्याने त्यांनी बाजारात याची चौकशी केली. त्या वेळी एक बोलार्ड १२०० ते १५०० रुपये तर स्टीलचे बेंच बाजारात ६ हजार रुपयांना उपलब्ध असल्याचे त्यांना आढळून आले. बागवे यांनी रितसर त्याचे कोटेशन पुराव्यानिशी सभागृहात ते उजेडात आणले. डीएसआरमधील दर व प्रत्यक्षातील दर यामध्ये मोठी तफावत असल्याने पालिकेला कोट्यवधींचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर डीएसआरच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
>ठेकेदारच तयार करतो इस्टिमेट
एखादे विकासकाम हाती घेण्यापूर्वी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांनी (जेई) त्या कामासाठी किती खर्च येणार आहे, याचे इस्टिमेट तयार करणे आवश्यक असते. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदारांकडूनच इस्टिमेट तयार केले जातात. एकीकडे डीएसआर चुकीचा, त्यानंतर इस्टिमेटही ठेकेदारच तयार करणार, पुन्हा टेंडर प्रक्रियेत रिंग करून विशिष्ट व्यक्तीलाच ते चढ्या भावाने दिले जाणे या सगळया प्रक्रियेत विकास कामांचा खर्च वाढत जातो.
>बोलार्ड व बेंचेसच्या डीएसआरची चौकशी अहवालाची प्रतीक्षा
प्रशासनाकडून बोलार्ड व बेंचेसच्या किमती डीएसआरमध्ये मोठ्याप्रमाणात वाढविल्याच्या प्रकरणाची येत्या ५ दिवसांमध्ये चौकशी करून, त्याचा अहवाल सादर केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या चौकशीतून डीएसआर बनविण्याच्या चुकीच्या पद्धती उजेडात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.