मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘डीटीई’चा दिलासा
By admin | Published: June 16, 2014 01:06 AM2014-06-16T01:06:26+5:302014-06-16T01:06:26+5:30
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेल की नाही
३ महिन्यांची मुदत : जातवैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र सादर करण्याची तात्पुरती सूट
नागपूर : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेल की नाही असा प्रश्न आहे. परंतु ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) यासंदर्भात पुढाकार घेत अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणीच्या वेळी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देण्यात आली आहे. विद्यार्थी त्याऐवजी हमीपत्र सादर करू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.‘डीटीई’चे संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी यासंदर्भात अधिसूचनाच जारी केली आहे. २२ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील, असे सांगण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयारच झाले नसल्याने आता काय करायचे, अशी विचारणा होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन अधिसूचनेनुसार संबंधित अभ्यासक्रमाच्या केंद्राभूत प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश फेरीमार्फत प्रवेश झाल्यानंतर ३ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. जर विद्यार्थी या वेळेत प्रमाणपत्र देऊ शकले नाहीत तर त्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीडीबीएम या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्यांनाही ही अट लागू राहील. (प्रतिनिधी)