कोल्हापूर विभागाला दुहेरी मुकुट

By admin | Published: October 7, 2015 12:36 AM2015-10-07T00:36:58+5:302015-10-08T01:10:10+5:30

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : मुलांत लातूर, तर मुलींच्या गटात पुणे उपविजेते

Dual crown for Kolhapur division | कोल्हापूर विभागाला दुहेरी मुकुट

कोल्हापूर विभागाला दुहेरी मुकुट

Next

कै. प्रा. वीरसेन पाटील क्रीडानगरी, शिरोळ : येथील श्री पद्माराजे विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील शालेय कबड्डी स्पर्धेत मुली व मुलांच्या कोल्हापूर संघाने दुहेरी अजिंक्यपद पटकावून राज्यात वर्चस्व सिद्ध केले.
शिरोळ येथे सोमवारपासून राज्यस्तरीय शालेय कबड्डी चाचणी स्पर्धेला प्रारंभ झाला होता. या स्पर्धेत मुली व मुलांचे एकूण १५ संघ सहभागी झाले होते. क्रीडा युवक सेवा संचनालय पुणेद्वारा जिल्हा क्रीडा परिषद, बाल शिवाजी मंडळ, शिरोळ व दत्त महाविद्यालय, कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतून १४ आॅक्टोबरला तेलंगणा राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला.
पुरुष विभागात कोल्हापूर विरुद्ध लातूर संघात प्रथम क्रमांकासाठी सामना झाला. यावेळी झालेल्या सामन्यात एकतर्फी गुणांची आघाडी घेत कोल्हापूर (३४) संघाने लातूर (१८) संघावर १६ गुणांनी विजय मिळविला. त्यामुळे द्वितीय क्रमांकाचा मानकरी लातूर विभाग संघ ठरला.
मुली विभागात प्रथम क्रमांकासाठी कोल्हापूर विरुद्ध पुणे संघात चुरशीचा सामना झाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा हा सामना रंगत असताना मध्यंतरापर्यंत कोल्हापूर ११, तर पुणे संघ ७ असे गुण झाले. त्यानंतर कोल्हापूर संघाने सांघिक शक्ती व पकडीच्या जोरावर पुणे संघावर ३१ गुणांनी सहज विजय मिळविला. पुणे संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
विजेत्या संघाना कै. प्रा. वीरसेन पाटील स्मृतिचषक व सन्मानपत्र देऊन आ. उल्हास पाटील, उद्यानपंडित गणपतराव पाटील, क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल, संचालक एन. बी. मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, संजय पाटील-यड्रावकर, अनिलराव यादव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे संयोजन उत्कृष्ट केल्याबद्दल बाल शिवाजी मंडळाचे अमरसिंह पाटील,
प्रा. आण्णासो गावडे यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची घोषणा
शिरोळ येथील कै. प्रा. वीरसेन पाटील क्रीडानगरी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून तेलंगणा राज्यात १४ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची यावेळी निवड करण्यात आली. याची घोषणा जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांनी केली.
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेला राज्यस्तरीय संघ असा - मुलांच्या संघात- सूरज महाडिक (कोल्हापूर), प्रमोद माने-गावडे (कोल्हापूर), संदीप राठोड (लातूर), आकाश गायकवाड (मुंबई), तुषार माळोदे (नाशिक), नरेश माने (कोल्हापूर), दिनेश वडार (कोल्हापूर), ज्ञानेश्वर नागावे (औरंगाबाद), दीपक वडाजे (लातूर), निशांत देवकर (मुंबई), सुमित घोम (अमरावती) प्रवीण म्हात्रे (मुंबई) यासह राखीव खेळाडू म्हणून तुषार भोईर (औरंगाबाद), रोहिदास सूर्यवंशी (लातूर), संकेत कुरकुटे (पुणे) यांची निवड झाली.
मुलींच्या संघात- सोनाली हेळवी (कोल्हापूर), समरीन बुरोडकर (कोल्हापूर), ऐश्वर्या शिंदे (पुणे), सायली शिंदे (कोल्हापूर), प्रणाली लहानगे (नाशिक), सृष्टी चाळके (मुंबई), प्रेमा जमादार (पुणे), दीपा बुट्टे (औरंगाबाद), लीना जमदाडे (पुणे), तेजश्री चौगुले (मुंबई), अश्विनी पोमन (औरंगाबाद), पूनम राठोड (कोल्हापूर) यासह राखीवसाठी ज्योती पाटील (पुणे), ऋती जारंडर (नाशिक), ऐश्वर्या ताटे (कोल्हापूर) यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
राष्ट्रीय खेळाडू सुवर्णा बारटक्के यांनी स्पर्धेचे निरीक्षणकेले. तसेच निवड समितीचे सदस्य अनिल सातव, गीता साखरे, शंकर पवार यांनी संघातील खेळाडूंची निवडी केली.

शिरोळ येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलींच्या कोल्हापूर संघास बक्षीस देताना आमदार उल्हास पाटील. शेजारी आण्णासाहेब गावडे, क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल, संचालक एन. बी. मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, रावसाहेब देसाई, अनिल यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Dual crown for Kolhapur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.