तरुणाई अपायकारक कोल्ड्रींक्स, फ्रोझन आईस्क्रीम्सच्या आहारी
By Admin | Published: April 20, 2017 03:35 AM2017-04-20T03:35:12+5:302017-04-20T03:35:12+5:30
शीतपेयांमध्ये शरीराला हानिकारक घटक असल्याचे दाखवून देण्यात आल्यानंतरही उकाड्यावर मात करण्यासाठी शरीराला हानिकारक पेयांचा वापर केला जात आहे
प्राची सोनवणे , नवी मुंबई
शीतपेयांमध्ये शरीराला हानिकारक घटक असल्याचे दाखवून देण्यात आल्यानंतरही उकाड्यावर मात करण्यासाठी शरीराला हानिकारक पेयांचा वापर केला जात आहे. विशेषत: तरुणवर्ग याबाबत फारसा जागरूक नसल्याने अशा घातक पदार्थांचे सेवन केले जात आहे. कोल्ड्रींक्स, फ्रोझन डेझटर््च्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती सध्या सोशल मीडिया, वृत्तपत्रांच्या माध्यमातून तसेच आहारतज्ज्ञांकडून मिळत असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
या शीतपेयांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, आजारांविषयी शीतपेयांमध्ये स्वीटनर, कंस्ट्रेट, कार्बन डायआॅक्साईड आणि प्रिझर्व्हेटिव्ह हे चार प्रमुख घटक असतात. याशिवाय वेगवेगळ्या पेयांमध्ये कात, सुपारी, कोक यांचाही वापर केला जातो. अशा प्रकारची शीतपेये सातत्याने प्यायल्यामुळे त्या व्यक्तीला त्या शीतपेयाचे एक प्रकारे व्यसन लागते. अशा प्रकारची शीतपेये पोटासाठी सर्वात धोकादायक आहेत. शीतपेये गोड बनवण्यासाठी त्यामध्ये सॅक्रि नचा वापर करण्यात आला असेल तर त्यामुळे कर्करोगाचा धोका असतो. मधुमेह, हाडांची दुखणी, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसाठी शीतपेये हानिकारक असतात. कॉलेजचा कट्टा असो वा आॅफिसचे कँटीन याठिकाणी कोल्ड्रींक्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेकदा पाण्याची तहान भागविण्यासाठी तरुणवर्गाकडून या घातक शीतपेयाचा वापर केला जातो.
फ्रोझन आईस्क्रीम नकोच
फ्रोझन डेझर्टमध्ये वनस्पतीजन्य तेल वापरले जाते. डालडा आणि वनस्पतीजन्य तेल (पाम, सूर्यफूल, सरकी आदी तेलबियातील तेल) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. डालडा हे हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल आॅईल आहे म्हणजेच तेलबियातील तेलावर प्रक्रि या केल्यावर मिळणारा घन (तुपासारखा) पदार्थ. मुळात आईस्क्रीम म्हणजे दुधापासून तयार केलेला पदार्थ होय. मात्र फ्रोझन आईस्क्रीमने ही संकल्पना पुसून टाकत दुधातील स्निग्ध पदार्थ न वापरता शरीराला घातक वनस्पती तेल (डालडा) वापरले जात आहे. तरुणवर्गामध्ये याबाबत जनजागृती करणे आवश्यक असून जिभेचे चोचले न पुरविता आरोग्याच्या दृष्टीने हितकारक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
कोल्ड्रींक्सला आहे नैसर्गिक पर्याय
कोल्ड्रींक्सऐवजी फळांचा रस, सरबत, शहाळाचे पाणी, ताक, लस्सी, कोकम, कैरीचे पन्हे, गुलाबपाणी अशा पर्यायांचा वापर नक्कीच आरोग्यदायी ठरू शकतो. घरच्या घरी आणि झटपट तयार होणाऱ्या या पर्यायाचा वापर या उकाड्यात नक्कीच लाभदायी ठरेल.
जाहिराती, मीडियाच्या माध्यमातून नुकताच फ्रोझन आईस्क्रीम आणि दुधातील स्निग्ध पदार्थांचा वापर करून तयार केलेले आईस्क्रीम यातील फरक समजला. तेव्हापासून आईस्क्रीम निवडताना मात्र विचार करते. मात्र त्यापूर्वी याविषयी कसलीच माहिती नव्हती. शीतपेय आणि भाज्या-फळांचा वापर करून तयार केलेले सरबत यांच्या चवीत फरक असल्याने अनेकदा शीतपेय पिण्याचा मोह टाळता येत नाही.
- किमया परजणे, बेलापूर
वाढत्या उकाड्यातून काही काळापुरती सुटका व्हावी, थंडावा मिळावा म्हणून कॉलेजच्या कँटींगमध्ये कोल्ड्रींक्स पिले जाते. त्या तुलनेने फळांचा रस फार काळ टिकत नसल्याने तो सोबत नेणे शक्य होत नाही. त्यामुळे तात्पुरता थंडावा मिळावा याकरिता कोल्ड्रींक्सचा पर्याय वापरला जातो. कोल्ड्रींक्सचे होणारे दुष्परिणाम माहीत असले तरीदेखील शीतपेयांचे सेवन केले जाते.
- मयुरी मांजरे, वाशी
शीतपेय आणि फळ-भाज्यांचा रस यामध्ये शीतपेयाची चव आवडते. आरोग्यासाठी हिताचे नसले तरी कधीतरी पिल्याने फारसा परिणाम होत नाही. फ्रोझन आईस्क्रीमविषयी फारशी माहिती नाही आणि ते पारखणेही अशक्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शीतपेय आणि आईस्क्रीमला अधिक पसंती देतो.
- यशस हांडोरे
जॉगिंग ट्रॅकवरही भाज्या-फळांचे ज्युस
फिटनेसविषयी जागरूक असलेल्यांकरिता शहरातील जॉगिंग ट्रॅकवरही विविध फळे, भाज्या, पालेभाज्यांपासून तयार केलेले सरबत उपलब्ध आहेत. आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी कारले, पालक, गाजर, बीट, काकडी, अंकुरीत गहू आदी सरबतांचे प्रकार चाखायला मिळतात. या पोषक द्रव्यांनाही चांगली पसंती मिळत असल्याचे दिसून येते. शीतपेयांच्या आहारी गेलेल्या तरुणवर्गाला या आरोग्यदायी सरबतांविषयी तसेच त्याच्या लाभांविषयी माहिती असणे आवश्यक आहे.