Maharashtra Cabinet Expansion : 'यामुळे' आदित्य ठाकरेंची कॅबिनेटमध्ये एंट्री ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:33 AM2019-12-31T11:33:45+5:302019-12-31T11:35:13+5:30
Maharashtra Cabinet Expansion : कॅबिनेटचा दर्जा मिळाल्यामुळे आदित्य यांना मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्याही बैठकीला हजेरी लावता येणे शक्य होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत राहून त्यांना राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने समजून घेता येणार आहे.
मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्याचवेळी पक्षासाठी अनेक वर्षे खस्ता खाणाऱ्या नेत्यांना डावलण्यात आले आहे. हे सगळ होत असताना पहिल्यांदाच विधानसभेला निवडून येणाऱ्या आदित्य ठाकरे यांची कॅबिनेटमध्ये झालेली एंट्री चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मंत्रीपदं देताना पक्षनेतृत्वासमोर पेच निर्माण झाला होता. तिन्ही पक्षांची ही अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. तर नव्या चेहऱ्यांना डायरेक्ट मंत्रीपद देण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा विधानसभेत दाखल झालेले प्राजक्त तनपुरे आणि अदिती तटकरे यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. हे दोघेही राज्यमंत्री झाले आहे. तर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेटमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
आदित्य यांच्या कॅबिनेट दर्जामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वडिल मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य पक्षसंघटनेवर लक्ष देतील अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांनी फाटा दिला आहे. तर आदित्य ठाकरेही उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून त्यांच्यासोबत दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटच्या बैठकीत आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी देखील एक आमदार कॅबिनेटच्या बैठकीला का, असे प्रश्न उपस्थित कऱण्यात येत होते.
दरम्यान कॅबिनेटचा दर्जा मिळाल्यामुळे आदित्य यांना मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्याही बैठकीला हजेरी लावता येणे शक्य होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत राहून त्यांना राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने समजून घेता येणार आहे. त्यामुळेच त्यांना कॅबिनेटमंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.