पर्यायी मार्गांमुळे एसटी ‘खड्ड्या’त

By admin | Published: August 22, 2016 05:38 AM2016-08-22T05:38:10+5:302016-08-22T05:38:10+5:30

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ग्रुप बुकिंग योजनेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे

Due to alternative routes, ST 'Khadala' | पर्यायी मार्गांमुळे एसटी ‘खड्ड्या’त

पर्यायी मार्गांमुळे एसटी ‘खड्ड्या’त

Next

सुशांत मोरे,

मुंबई- गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ग्रुप बुकिंग योजनेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, मार्ग क्रमांक ६६ ची झालेली दुरवस्था पाहता आणि वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना पर्यायी मार्ग सुचविले आहेत. या मार्गांमुळे एसटी प्रवाशांच्या खिशाला जरी कात्री लागणार असली, तरी महामंडळालाही या मार्गावरून जाताना मोठा टोल भरावा लागणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच पाच दिवसांतच तब्बल २१ लाख रुपये टोल भरावा लागेल, अशी माहिती समोर आली आहे.
महामार्ग क्रमांक ६६ हा जुना एनएच-१७ म्हणून ओळखला जातो. हा मार्ग मुंबई-पनवेल-पेण-माणगाव-महाड आणि पुढे जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने मुंबई ते चिपळूणपर्यंत जाणाऱ्या बसेस खोपोली, पालीमार्गे माणगाव, महाड, चिपळूणपर्यंत, तर चिपळूणच्या पुढे रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या एसटी बसेसना पुणे, सातारा, उंब्रज (कुभांर्ली घाट) मार्गे जाण्याचा पर्याय दिला आहे. हा पर्याय फक्त ग्रुप बुकिंग केलेल्या एसटी बसेसना लागू आहे. एसटी महामंडळाच्या जवळपास २००० फेऱ्यांचे ग्रुप बुकिंग झाले असून, त्यांनी जुन्या अथवा पर्यायी मार्गांपैकी एक मार्ग निवडायचा आहे.
पर्यायी मार्ग निवडल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागतानाच महामंडळालाही टोलचा भुर्दंड पडणार आहे. जुन्या मार्गे एसटीच्या ग्रुप बुकिंग बसेस गेल्यास त्यांना वाशी जवळचा एकच टोल लागेल, तर पर्यायी मार्गावरून गेल्यास वाशी, मेगा हायवे, खेड-शिवापूर, आनेवाडी आणि उंबरज व वठार असे टोल लागतील. पर्यायी मार्गावरून गेल्यास महामंडळाला १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या काळात टोल भरण्यासाठी एकूण २१ लाख रुपये मोजावे लागतील.
वाहतूककोंडी होऊ नये आणि गणेशोत्सवात महामार्गावरील प्रवास सुकर व्हावा, यासाठी पर्यायी मार्ग स्वीकारताना महामंडळाला मोठा भुर्दंड पडत असल्याने शासनाने टोलमाफी द्यावी, यासाठी एसटीची धडपड
सुरू आहे.
‘आॅन द स्पॉट’ जादा भाडे घेणार
मोठ्या प्रमाणात एसटीचे ग्रुप बुकिंग झाले आहे. ग्रुप बुकिंग प्रवाशांनी पर्यायी मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना जादा भाड्याची कल्पना देण्यात येईल आणि त्याच वेळी बसमध्ये प्रवाशांकडून जादा भाडे घेण्यात येईल, असा निर्णय दोन दिवसांपूर्वीच एसटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवलीला जाईपर्यंत प्रत्येकी १00 रुपयांपेक्षा जास्त जादा रुपये मोजावे लागतील.
>गणेशोत्सवानिमित्त पर्यायी मार्गावरून जाणाऱ्या बसेसना टोलमाफी मिळालेली नाही. किती ग्रुप बुकिंग बसेस पर्यायी मार्गावरून जाणार आहेत, त्याचा आढावा घेत आहोत आणि त्यानुसार, शासनाकडे आम्ही टोल माफी मागू.
- रणजित सिंह देओल (एसटी महामंडळ-व्यवस्थापकीय संचालक)
पर्यायी मार्गामुळे एसटी महामंडळाला टोल भरावा लागतानाच इंधनाचा खर्चही येणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवरही भार पडेल, असे सांगितले जाते.

Web Title: Due to alternative routes, ST 'Khadala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.