आमीरमुळे प्रशासन ‘ड्युटी’वर !
By Admin | Published: April 18, 2016 03:20 AM2016-04-18T03:20:20+5:302016-04-18T03:20:20+5:30
राज्यातील जलसंधारण चळवळीला हातभार लावण्यासाठी सध्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या अभिनेता आमीर खानला साताऱ्यात सुखद अनुभव आला.
सातारा : राज्यातील जलसंधारण चळवळीला हातभार लावण्यासाठी सध्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या अभिनेता आमीर खानला साताऱ्यात सुखद अनुभव आला.
रविवारची सुटी असतानाही ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने मंडल अधिकाऱ्यांपासून तलाठी, ग्रामसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत झाडून सगळे प्रशासन ‘ड्युटी’वर हजर असलेले पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मात्र प्रशासनाची
ही ‘कार्यतत्परता’ लोकप्रतिनिधींना
रुचली नाही.
‘सत्यमेव जयते’ व ‘पानी फाउंडेशन’च्या राज्यातील सातारा, अमरावती अन् बीड या तीन
जिल्ह्यांत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत.
या कामांत लोकसहभाग वाढावा म्हणून ‘वॉटर कप’ स्पर्धाही घेण्यात येणार आहे. कोरेगाव तालुक्यातील (जि. सातारा) ४० गावांतील ग्रामस्थ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत ५० लाख (प्रथम), ३० लाख (द्वितीय) व १० लाख (तृतीय) अशी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनमध्ये ‘वॉटर कप’ या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्यासह इतरही अनेक अधिकारी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
तिथेही अशीच तत्परता दाखवावी
रविवारी सुटी असतानाही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आमीर खान यांच्या बैठकीत ज्या उत्साहाने प्रशासन हजर झाले होते, तीच तत्परता दुष्काळी भागातील टँकर अन् छावण्यांसाठी दाखविली असती तर सध्याची भीषणता थोडीफार तरी कमी झाली असती, अशा भाषेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या स्पर्धेत श्रमदानातून केल्या जाणाऱ्या जलसंधारण कामाला अधिक महत्त्व आहे. काम कशा पद्धतीने करायचे, यासाठी प्रत्येक गावातील पाच ग्रामस्थांना प्रशिक्षणही देण्यात आले. कोणत्याही कामात नियोजन केले तर ते यशस्वी होतेच, त्यासाठी एकजूट हवी. मी काही मोजकेच चित्रपट करतो; पण जे करतो ते मनापासून आणि परफेक्ट करतो, तसे तुम्हीही हे काम परफेक्ट करा.- आमीर खान, अभिनेता