मुंबईः पालिका शाळेत खिचडी खाऊन 32 विद्यार्थ्यांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 04:57 PM2017-12-13T16:57:18+5:302017-12-13T17:33:30+5:30
मुंबई : जोगेश्वरी पूर्वच्या एका पालिका शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मेघवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
मुंबई : जोगेश्वरी पूर्वच्या एका पालिका शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर 32 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यात 19 मुलींचा समावेश आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मेघवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. जोगेश्वरी पूर्वच्या सर्वोदय नगरमध्ये असलेल्या बालविकास ही इंग्रजी आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे.
एका पालकाने 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास 'मिडडे मिल' म्हणून मधल्या सुट्टीमध्ये ही खिचडी मुलांना वाटण्यात आली होती. शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर साडेबाराच्या सुमारास मुलांची स्थिती अचानक बिघडली. त्यांना मळमळू लागले. त्यानुसार जवळपास 32 मुलांना जोगेश्वरीच्या कोकण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कांजूरमार्गमधील एक संस्था या शाळेला खिचडी पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार या खिचडीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही बातमी वाऱ्यासारखी जोगेश्वरी परिसरात पसरली आणि पालकांनी शाळेसमोर गर्दी केली. मेघवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणी चौकशी सुरू आहे.