डीजे बंदीमुळे पारंपरिक वाद्यांना सुगीचे दिवस
By admin | Published: April 29, 2016 02:11 AM2016-04-29T02:11:03+5:302016-04-29T02:11:03+5:30
डीजे वाजविण्यास बंदी घातल्याने वधू-वरांच्या लग्नात आता सर्रास बँड पथक, बँजो पार्टी, पारंपरिक वाद्ये वाजू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
अवसरी : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) ग्रामसभेत गावात लग्ने व वरातीत डीजे वाजविण्यास बंदी घातल्याने वधू-वरांच्या लग्नात आता सर्रास बँड पथक, बँजो पार्टी, पारंपरिक वाद्ये वाजू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात तीन ते चार डीजे आहेत. तालुक्यात एकूण अंदाजे १०० ते १५० डीजे असल्याने लग्न वरातीत सर्रास डीजेचा वापर होतो. ज्याच्या डीजेचा आवाज मोठा त्याच्या डीजेला मागणी जास्त. डीजेच्या आवाजामुळे ज्यांना हृदयरोगाचा आजार आहे, अशा लोकांच्या छातीत दुखणे, ० ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे कान बहिरे होणे, मांडणीची भांडी जमिनीवर पडणे, डॉक्टरांच्या कपाटातील औषधांच्या बाटल्या खाली पडणे हे प्रकार अनेक वर्षे चालू होते. याला गावठाणातील रहिवासी कंटाळले होते. वरातीत डीजे, बिर्याणी, दारू असल्यामुळे तरुण नाचायला येतात, नाही तर कोणी नवरदेवाला विचारत नाही. काही लोक लग्न सामुदायिक सोहळ्यात करतात, मात्र हेच नवरदेव रात्रीच्या वेळी वरातीसाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च करतात. (वार्ताहर)
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अवसरी खुर्द हे गाव आमदार आदर्श योजनेत घेतल्याने गावामध्ये डीजे दारूधंदे बंद करण्याचा निर्णय ग्रामपांयतीच्या वतीने ग्रामसभेत घेतला. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत मंचर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात डीजे, अवैध दारूधंदे बंद झाले. मंचर पोलीस ठाण्याला मोठ्या प्रमाणात डीजे, अवैध दारूधंद्यांकडून हप्ते मिळत असल्याने रात्रीच्या वेळी छोट्या आवाजात डीजे चालू आहेत, तर अवैध दारू व्यवसायसुद्धा चालू असल्याचे पाहावयास मिळत आहे.