बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी, नुकसानभरपाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 08:30 PM2018-07-13T20:30:31+5:302018-07-13T20:31:50+5:30
परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.
लातूर : परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. दरम्यान, बोगस बियाणांमुळे शेतकºयांना मात्र दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुबार पेरणीची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी मनसेने केली असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख ४ हजार हेक्टर आहे. त्यापैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. उगवणशक्ती कमी असलेल्या सोयाबीनच्या बियाणांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांना त्याचा फटका बसला आहे. नव्हे, त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान शेतक-यांचे आहे. शेतक-यांचे हे नुकसान कृषी विभाग, बियाणे कंपन्या व विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळेच झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
बियाणे विक्रीस आणण्यापूर्वी कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण विभागाने बियाणांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे होते. मात्र कंपन्यांशी साटेलोटे असल्यामुळे उगवणक्षमता तपासली गेली नाही. कंपन्यांनी बाजारातील सोयाबीन खरेदी करून व त्याच्या बियाणे बॅगा तयार करून विक्रेत्यांच्या मदतीने शेतक-यांना विकल्या. अशा जवळपास २१ कंपन्यांचे नमुने परभणीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत नापास झाले आहे. हे वाण कोणत्या कोणत्या शेतक-यांना विकले याची यादी विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याने त्या यादीनुसार सरसकट सर्व शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी. पेरणीच्या गडबडीत बियाणे न उगवलेल्या शेतक-यांना न उगवल्याची तक्रार करता आली नाही. त्यामुळे ज्या शेतक-यांची तक्रार आली नाही, त्यांनाही मदत करावी, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
शेतक-यांना फसविणा-या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, भागवत शिंदे, भास्कर औताडे, रवि सूर्यवंशी, बाळासाहेब मुंडे यांनी दिला आहे.