ढगाळ हवामानामुळे थंडी किंचित ओसरली
By admin | Published: January 16, 2017 05:50 AM2017-01-16T05:50:08+5:302017-01-16T05:50:08+5:30
पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात थंडीची लाट आली
पुणे : पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात थंडीची लाट आली असून, विदर्भाच्या काही भागांतही थंडीचा जोर कायम आहे़ दरम्यान, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ मात्र, वातावरण काही अंशी ढगाळ झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे.
विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे़ मात्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत खूप वाढ झाली आहे़, तसेच मराठवाड्याच्या काही भागातही तापमानात किंचित वाढ झाली आहे़
पुण्यात तीन दिवसांपूर्वी या हंगामातील नीचांकी ७़४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर, गेल्या दोन दिवसांत त्यात सातत्याने वाढ होत आहे़ रविवारी सकाळी पुण्यात किमान तापमान १३़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहून किमान तापमान
१२ अंशाच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे़ मध्य
महाराष्ट्रात अनेक ठिकाणाच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)
>राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई २१, अलिबाग १९़४, रत्नागिरी १८़४, पणजी २०़७, डहाणू १७़५, भिरा १७़५, पुणे १३़९, जळगाव १३़५, कोल्हापूर १६़२, महाबळेश्वर १४, मालेगाव १३़४, नाशिक १४़६, सांगली १५़९, सातारा १५़९, सोलापूर १६़२, औरंगाबाद १३़६, परभणी १३़४, नांदेड १५, बीड १४, अकोला १३़६, अमरावती ११, बुलढाणा १६़४, ब्रह्मपुरी १०़९, चंद्रपूर १२, गोंदिया ७़१, नागपूर १०़३, वाशिम ९़२, वर्धा ११़५, यवतमाळ १२़४़