थंडीमुळे वाढतात आजार ,घ्या विशेष काळजी
By Admin | Published: November 7, 2016 03:19 AM2016-11-07T03:19:13+5:302016-11-07T03:19:13+5:30
आॅक्टोबर हिटच्या झळानंतर मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा घटला असल्यामुळे, मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यायला हवी
मुंबई : आॅक्टोबर हिटच्या झळानंतर मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा घटला असल्यामुळे, मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यायला हवी. थंडी वाढल्यामुळे श्वसनासंबधीचे आजार आणि सांधेदुखीचे प्रमाण वाढते.
वातावरणातील बदलांचा परिणाम हा आरोग्यावर होतो. या काळात सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढते. हवेतील बदलांमुळे आजार वाढल्यास तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. सर्दी-खोकल्याबरोबरच सायनसचा त्रासही वाढतो. थंडीच्या काळात वाढणाऱ्या धुक्याचा परिणाम प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर होतो. त्यामुळे या काळात श्वसनासंबंधीचे आजार बळावतात. घशाला संसर्ग होतो. त्याचबरोबर, श्वसनसंस्थेला संसर्ग होण्याचा धोकाही अधिक असतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होतो. मुंबईसारख्या शहरात धुरक्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुंबईकरांनी सकाळी लवकर घराबाहेर पडताना नाक-तोंड झाकून बाहेर पडल्यास त्रास होणार नाही, असे मत श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी मांडले.
दमा असणाऱ्या रुग्णांना या काळात अधिक त्रास वाढतो. दम्याच्या त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडी वाढायला सुरुवात झाल्यावर या रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. थंडी लागू नये, म्हणून गरम कपडे घातले पाहिजेत. योग्य वेळी औषधे घेतली पाहिजेत, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
थंडीत सांधेदुखी त्रास बळावते. सकाळी उठल्यावर सांधे आखडण्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. हा त्रास टाळण्यासाठी सांधेदुखी असलेल्या व्यक्तींनी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (प्रतिनिधी)