ऊसतोडणी कामगारांच्या संपामुळे गाळपाचा मुहूर्त हुकला
By admin | Published: October 24, 2015 03:15 AM2015-10-24T03:15:26+5:302015-10-24T03:15:26+5:30
शासनपातळीवर सुरू असलेल्या गोंधळामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाचा तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यात ६३ साखर कारखान्यांची धुराडी पेटूनही ऊस गाळपासाठी मोळी
पुणे : शासनपातळीवर सुरू असलेल्या गोंधळामुळे अद्यापही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाचा तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यात ६३ साखर कारखान्यांची धुराडी पेटूनही ऊस गाळपासाठी मोळी टाकण्याचा दसऱ्याचा मुहूर्त हुकला.
दसऱ्याला राज्यात केवळ ९ साखर कारखान्यांनी मुळी टाकण्याचा कार्यक्रम केला. राज्यातील ऊसतोडणी वाहतूक कामगारांच्या वेतनवाढ प्रश्नावर लवादाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कारखान्यांनी तोडणी वाहतूक कामगारांशी करार केला असला, तरी प्रत्यक्षात कामगार कामावर हजर झालेले नाहीत. काही कारखान्यांना कामगारांच्या टोळ्या मिळाल्याने त्यांची तोडणी सुरू झाली; परंतु मजुरांचा तिढा सुटल्याशिवाय हंगामाला गती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात ६३ कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. यामध्ये कोल्हापूर १०, सांगली १५, पुणे १०, सोलापूर १७, नगर ७ आणि नाशिक जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. त्यात वसंतदादा, बारामती अॅग्रो, सहकारमहर्षी, चंद्रभागा, विठ्ठल सहकारी आणि पांडुरंग सहकारी विठ्ठलराव शिंदे, लो. बा. पाटील अॅग्रो, विठ्ठल कार्पोरेशन या नऊ कारखान्यांचे प्रत्यक्ष गाळप सुरू झाले आहे. त्याशिवाय पीयूष शुगर आणि अंबालिका या नगर जिल्ह्यातील दोन कारखान्यांनीही प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयात गाळप परवान्यासाठी ५० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले आहेत.