संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By Admin | Published: June 28, 2016 02:43 AM2016-06-28T02:43:49+5:302016-06-28T02:43:49+5:30

शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली.

Due to the continuous rainy season life disorder | संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

googlenewsNext


ठाणे : शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली. ठाणे शहरात सोमवारी दिवसभरात ८० मिमीच्या आसपास पावसाची नोंद झाली. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. ब्रह्मांड येथे पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून ८ गाड्यांचे नुकसान झाले. तर, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. विशेष म्हणजे धरण क्षेत्रातही पाऊस बरसण्यास सुरुवात झाल्याने आता समाधान व्यक्त होत आहे.
या पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळीत झाली होती. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने धावत होत्या.
लांबलेल्या पावसाने शुक्रवारी जिल्ह्यात आगमन केले. त्यानंतर, सलग तीन दिवस पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पडझडीच्या घटना घडल्या. ठाण्याच्या आपत्कालीन कक्षाकडे सोमवारी सुमारे २८ तक्र ारींची नोंद झाली. त्यामध्ये शॉर्टसर्किट १, झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या ९, पाणी तुंबण्याची १, भिंत कोसळण्याची एक अशा तक्र ारींचा समावेश होता. ब्रह्मांड येथे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भिंतीलगतच्या २ कार आणि ६ दुचाकींचे नुकसान झाले. तर, कोपरी येथील रतन सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील गांगुर्डे यांच्या घराचे छत कोसळले.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुरबाड, शहापूर, कल्याण तालुक्यांमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मुरबाड-शहापुरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातसा धरण क्षेत्रामध्ये दिवसभरात ४०, मोडकसागर धरण क्षेत्रात ३१.४०, तानसा धरण क्षेत्रात ३१.४० आणि बारवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत २४ मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत डहाणूमध्ये २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १० वर्षांत डहाणू शहरात झालेला हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पालघर जिल्ह्यात जूनच्या सुरु वातीला दडी मारून बसलेल्या वरु णराजाने महिन्याच्या अखेरीला जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्यानाल्यांची पाणीपातळी वाढली असून बळीराजा सुखावला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी योग्य नियोजनाअभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वरुणराजाने रंग दाखवताच प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलेले रस्ते, वीज आणि नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. पहिल्याच पावसात काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचा सततचा लपंडाव सुरू असून चहूकडे पाणीचपाणी झाले आहे.
>उल्हासनगरात ३ दिवसांत १८ झाडे पडली
उल्हासनगर शहरातील जनजीवन संततधार पावसाने विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांत १८ पेक्षा जास्त झाडे कोसळली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यावर झाड पडल्याने पोलीस ठाण्याचे पत्रे फुटून विद्युतपुरवठा खंडित झाला होता. तर, सखल भागांत पाणी साचण्याचे प्रकार घडले.
उल्हासनगरातील मार्केट परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. गुलशननगर, साईनाथ कॉलनी, राधास्वामी सत्संग, कल्याण-अंबरनाथ रस्ता, आयटीआयसमोर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गेल्या २४ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित झाला असून सार्वजनिक विभागाने दुरुस्ती काम सुरू केले आहे. उभ्या असलेल्या ४ ते ५ मोटारसायकलींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. शहरातील नाले तुंबून शहरात पाणी साचल्याच्या घटना घडल्या नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली.
अंबरनाथ-बदलापूरला दमदार हजेरी
अंबरनाथ : अंबरनाथ-बदलापूर परिसरांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले. यात शालेय विद्यार्थ्यांचे जास्त हाल झाले.
वाहतूककोंडीने कल्याण-डोंबिवलीकर हैराण : कल्याण - संततधार पावसाने सोमवारी चौथ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीला झोडपले. यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले असून अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत. विजेच्या लपंडावाने शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील शीळफाटा रोड, मानपाडा रोड, अंबरनाथ रोडवर वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांचे हाल झाले. कल्याण बस आगारात पावसाचे पाणी साचले असून त्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याशिवाय रामबाग, मानपाडा रोडसह अनेक गावठाणांत कचरा वेळेत उचलला न गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Due to the continuous rainy season life disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.