कोरोनामुळे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:25 PM2020-03-17T18:25:07+5:302020-03-17T18:28:12+5:30
भिमाशंकरमध्ये दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात..
भिमाशंकर : कोरोना विषाणु संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक मह्त्वाच्या देवस्थानांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचपार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील व बारा ज्योर्तिलिंगापैकी एक म्हणून ख्याती असलेले श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर आज (दि.१७ ) पासून दुपारी तीनची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांना बंद करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगत याची तीव्रता कमी होईपर्यंत हा निर्णय लागू राहील असे त्यांनी जाहीर केले. तसेच या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन भिमाशंकर देवस्थानने भाविकांना केले आहे.
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे , मुंबई, पंढरपूर , जेजुरी यांसारख्या मह्त्वाच्या देवस्थानांना मंदिर बंद ठेवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राज्यातील भिमाशंकर येथील ज्योर्तिलिंगाचे मंदिर बंद ठेवण्याविषयी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात बैठक झाली. यावेळी विश्वस्त पुरूषोत्तम गवांदे, दत्तात्रय कौदरे, प्रसाद गवांदे, आशिष कोडिलकर, संतोष गवांदे, जालिंदर कौदरे, दत्तु हिले, विश्वनाथ गायकवाड, देवस्थानचे व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे तसेच भिमाशंकर ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरेश कौदरे म्हणाले, भिमाशंकरमध्ये दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. यामध्ये एखादा भाविक कोरोना बाधित असेल तर यातून भाविक तसेच मंदिरात काम करणारे कर्मचारी,ग्रामस्थांना संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे शासनाकडून सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार भीमाशंकर मंदिर बंद करण्यात येत असून भाविकांनी दर्शनासाठी येणे टाळावे व गर्दी करू नये असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी केले आहे.
तसेच मंदिरात काम करणाऱ्या कर्मचारी व पुजाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत, सॅनिटायझरच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून सुरक्षा रक्षक प्रत्येक भाविकाला सॅनिटायझर लावून मंदिरात सोडत होते. मंदिर परिसरात जनजागृती करण्यासाठी फलक देवस्थानच्या वतीने लावण्यात आले असल्याचे व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे यांनी सांगितले.