जलवाहिनी फुटून दोघांचा मृत्यू
By admin | Published: July 8, 2017 04:43 AM2017-07-08T04:43:05+5:302017-07-08T04:43:05+5:30
वांद्रे येथील बेहराम पाड्यातील ७२ इंच व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. या जलवाहिनीच्या वाहणाऱ्या पाण्याने दोन सख्ख्या भावंडांचे
मुंबई : वांद्रे येथील बेहराम पाड्यातील ७२ इंच व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. या जलवाहिनीच्या वाहणाऱ्या पाण्याने दोन सख्ख्या भावंडांचे प्राण घेतले. या घटनेनंतर परिसरात काही वेळासाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घरांमध्ये पाणी शिरल्याने जवळपास पन्नास कुटुंबे बेघर झाली आहेत.
या घटनेनंतर जलवाहिनीलगतच्या दोन्ही बाजूंकडील झोपड्यांवर आॅक्टोबर महिन्यात कारवाई केली जाईल आणि जलवाहिन्या संरक्षित केल्या जातील, असे एच/ईस्टच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बेहरामपाड्यामध्ये इंदिरानगर जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे स्थानिकांनी घराबाहेर पडून नेमका प्रकार काय, हे पाहण्याआधीच पाण्याचा मोठा लोट त्यांच्या घरात शिरला. या ठिकाणी असलेल्या ७२ इंच व्यासाच्या जलवाहिनीचे झाकण उडाले आणि मधोमध ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या जलवाहिनीतून बाहेर येऊ लागले. नेमक्या काही अंतरावर असलेल्या झोपडीत प्रियांका डोईफोडे (९) ही मुलगी तिच्या आठ महिन्यांच्या भावाला खेळवत होती. हे दोघे अतिवेगवान पाण्यात वाहून गेले. ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. प्रियांकाला व्ही.एन. देसाई तर स्वप्निलला भाभा रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारचा दिवस असल्याने मुस्लीम बांधवांचा नमाज या ठिकाणी अदा केला जातो. बेघर झाल्याने रस्त्यावर आलेली कुटुंबे, साचलेले पाणी आणि त्यातच वाहनांमुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.
लेकरांची माय बेशुद्ध पडली
पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोटच्या पोरांची अवस्था आईला सहन न झाल्याने ती जागीच बेशुद्ध झाली.
महापालिका अधिकारी दोन तास उशिरा पोहोचले!
वांद्रे परिसरात इतकी मोठी घटना घडली तरी जवळपास दोन तास महापालिकेचा एकही अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केल्याचे एका खासगी संस्थेचे प्रमुख नामदेव गुल्दगड यांनी सांगितले. त्यांनी स्थानिकांसाठी जुने कपडे तसेच खाण्यापिण्याच्या सामानाची व्यवस्था केली.