कर्जमाफीवरून कोंडी

By admin | Published: March 14, 2017 07:45 AM2017-03-14T07:45:04+5:302017-03-14T07:45:04+5:30

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Due to debt waiver | कर्जमाफीवरून कोंडी

कर्जमाफीवरून कोंडी

Next

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिला आहे. महापालिका निवडणुकीत वरचढ ठरलेल्या भाजपाची कोंडी करण्याचाच हा प्रकार असून सत्ताधारी युतीत आता कुरघोडीचे राजकारण वेग घेण्याची चिन्हे आहेत. तसेच शिवसेनेच्या या भूमिकेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरणार हे स्पष्ट झाले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पहिल्या आठवड्यात कामकाज होऊ शकले नाही. धुळवड आणि तुकाराम बीजनिमित्त सोमवारी आणि मंगळवारी कामकाजाला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यावरून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपाची कोंडी केली. उत्तर प्रदेशात कर्जमुक्तीचे आश्वासन देता मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहे, असा सवाल शिवसेनेने केला. मात्र, शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आहे असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना आमदारांनी पहिल्या आठवड्यात स्वतंत्रपणे आंदोलन केले होते.
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत असताना शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले होते. आता, आदेश दिल्याने शिवसेना आमदारांचा मार्ग मोकळा झाला आहे.


कामकाज चालविण्याचे भाजपापुढे मोठे आव्हान
सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. परंतु कर्जमाफीमुळे फक्त बँकांचे फावते. सरकारला कर्जमाफी नव्हे तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी आहे, अशी भूमिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. त्यासाठी शेतीच्या शाश्वत विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी केला होता. मात्र, कर्जमाफीशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतल्याने पहिल्या आठवड्याचे कामकाज होऊ शकले नव्हते. दुसऱ्या
आठवड्यात हीच परिस्थिती कायम राहील.उलट, कर्जमाफीवरून शिवसेना उघडपणे मैदानात उतरल्याने विरोधकांची बाजू वरचढ ठरणार आहे. शनिवारी अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने त्यापूर्वी आवश्यक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर असणार आहे.

आदेशानुसार काम रोखणार
‘कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकरी कर्जातून बाहेर पडला पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबाराचा उतारा कोरा झाला पाहिजे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही केली होती. त्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे स्पष्ट आदेशच सर्व आमदारांना पक्षप्रमुखांनी दिले आहेत, अशी माहिती शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत खेडमध्ये दिली. शिवसेनेकडून होणाऱ्या या कोंडीतून आता भाजपा कसा मार्ग काढणार याची उत्सुकता असणार आहे.

Web Title: Due to debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.