डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अवयव दान अधुरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2016 09:25 PM2016-08-10T21:25:52+5:302016-08-10T21:25:52+5:30
अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी लातुरातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे कळविला.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि.10 - अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी लातुरातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे कळविला. मात्र डॉक्टरांनी तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिसाद न दिल्यामुळे अवयव दान होऊ शकले नाही. परिणामी, काही वेळातच बुधवारी सायंकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचे अवयव दान होऊ शकले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
कळंब तालुक्यातील मोहा येथील भरत कोंडिबा नागटिळक यांचा रविवारी बार्शी ते कळंब रस्त्यावर अपघात झाला. अपघातानंतर उपचारासाठी त्याला लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे भरत कोंडिबा नागटिळक (वय ३०) यांच्या नातेवाईकांनी उपचार करणारे डॉ. हनुमंत किनीकर यांच्याकडे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त करून निर्णय कळविला. मात्र डॉ. किनीकर यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांनाही अवयव दान करण्यासंदर्भात कळविले. मात्र या यंत्रणेचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भरत नागटिळक यांचे चुलत भाऊ नारायण नागटिळक यांनी थेट निवासी उपजिल्हाधिकारी नारायणराव उबाळे यांच्याशी संपर्क साधून अवयव दान करण्याला डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कळविले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी उबाळे यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत भरतचा सायंकाळी मृत्यू झाला अन् नातेवाईकांनी व्यक्त केलेली अवयव दानची इच्छा अधुरी राहिली, असा आरोप नारायण नागटिळक यांनी केला आहे.
प्रोसीजर केली; नातेवाईकांचा आरोप असमजातून...
नातेवाईकांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही तात्काळ शासकीय रुग्णालयाला कळविले. परंतु, अवयव दान करण्यासाठी बीपी १०० च्या पुढे असणे आवश्यक आहे, आॅक्सिजन, पल्सही नियमानुसार असणे आवश्यक आहे. ते अवयव दान करण्याच्या नियमात बसत नव्हते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णाचे अवयव घेता आले नाहीत. नातेवाईकांचा आरोप असमजातून आहे. डोळे तेवढे दान करता येतील, असे नातेवाईकांना कळविले असल्याचे डॉ. हनुमंत किनीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.