बदनामीच्या भीतीने बापाने गर्भवती मुलीचा गळा घोटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:33 AM2018-11-28T06:33:15+5:302018-11-28T06:33:26+5:30
जालना जिल्ह्यातील घटना; तीन तासांत चार आरोपींना अटक
पारध (जि. जालना) : अनैतिक संबधातून पोटच्या मुलीला गर्भधारणा झाल्याने समाजात बदनामी होईल, या भीतीने तिच्या वडिलांनी तिचा गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
समाधान डुकरे (४५, रा. जांब जि. बुलडाणा) यांनी साडूच्या मदतीने मुलगी छाया (२०) हिचा दोरीने गळा आवळून खून केला. पारध पोलिसांनी अवघ्या ३ तासांत प्रकरणाचा छडा लावून चारही आरोपींना जेरबंद केले.
महादू उगले (रा. रुईखेड मायंबा, ता. जि. बुलडाणा), अण्णा पुंजाजी लोखंडे (रा.सोनगीरी, ता. जाफराबाद, जि. जालना), आणि मुलीचा आतेभाऊ रामधन दळवी (रा.दिंडोरे नगर, असोदा, जि.जळगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
भोकरदन तालुक्यातील मेहगाव मार्गावर सोमवारी युवतीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पंचनामा करुन पारध ठाण्यात गुन्हा नोंद केला. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या पथकाने मुलीच्या वडिलांसह चौघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर अनैतिक संबधातून मुलगी गरोदर असल्याचा राग मनात धरुन खून केल्याची कबुली त्यांनी दिली.
मुलगा भेटण्यास आलाच नाही
शुभम लग्न करण्यास तयार असल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी सोमवारी जळगावात एका ठिकाणी त्याला भेटण्यास बोलविले. परंतु, शुभम आलाच नाही. छायाला त्याच्याविरूद्ध तक्रार देण्यास वडिलांनी सांगितले. तिने ऐकले नाही. त्यामुळे संतापलेल्या डुकरे यांनी मुलीला जिवे मारले.
गर्भपात न केल्याने कृत्य
दोन महिन्यांपासून मुलीच्या कुटुंबीयांनी तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. मात्र गर्भपात न करण्यावर छाया ठाम होती. प्रियकराविरुद्ध ती तक्रारही देत नव्हती. वारंवार समजावूनही मुलगी ऐकत नसल्याने आम्ही कंटाळून गेलो होतो. त्यामुळेच आम्ही टोकाचे पाऊल उचल्याची माहिती समाधान डुकरे यांनी न्यायालय परिसरात ‘लोकमत’ला दिली. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी काही महिन्यांपूर्वी ती पुण्याला कामानिमित्त गेली होती. तेथेच शुभमशी तिची ओळख झाली होती. ती गरोदर राहिल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्याने तिला मारहाण करुन काही दिवस उपाशी ठेवले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.