एसटीच्या विलंबाने प्रवासी हैराण
By admin | Published: July 14, 2017 03:10 AM2017-07-14T03:10:25+5:302017-07-14T03:10:25+5:30
पनवेलहून कल्याण, डोंबिवली व मुंब्रा या मार्गावरील एसटीच्या गाड्या नेहमीच उशिरा येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेलहून कल्याण, डोंबिवली व मुंब्रा या मार्गावरील एसटीच्या गाड्या नेहमीच उशिरा येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सायंकाळी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना गाडीसाठी दोन ते तीन तास थांबावे लागल्याने प्रवाशांचा उद्रेक झाल्याची घटना सोमवारी घडली. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद मिरवणारी एसटी प्रवाशांना चांगली सेवा कधी देणार, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
औद्योगिकीकरण व वाढत्या नागरीकरणामुळे अनेक प्रवासी एसटीने प्रवास करणे पसंत करतात. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून येणारा प्रवासी पनवेलला येऊन कल्याण, डोंबिवलीकडे जातो, पण पनवेल स्थानकातून सकाळी व सायंकाळी सुटणाऱ्या गाड्या नेहमीच दीड-दोन तास उशिरा असतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. सोमवारी रात्री तीन तास गाडी न आल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला. त्यांनी वाहतूक नियंत्रकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
पनवेल स्थानकातून दररोज डोंबिवलीसाठी ५९ फेऱ्या आहेत. पैकी १८ स्थगित व रोज ७-८ फेऱ्या रद्द होतात. मुंब्य्रासाठी ४४ फेऱ्या आहेत, पैकी १५ स्थगित तर रोज ४ ते ५ गाड्या रद्द होतात. याबाबत विचारणा केली असता खांदा वसाहत, कळंबोली, स्टील मार्केट, रोडपाली, तळोजा, शीळ फाटा व टोल नाक्यावर वाहतूककोंडी होत असल्याने विलंब होतो. वेळापत्रकानुसार पनवेल- डोंबिवली ६० मिनिटे व मुंब्रा ५५ मिनिटे वेळ धरला आहे. मात्र तेवढ्या वेळेत गाडी कधीच पोहचत नाही. त्यामुळे प्रत्येक फेरीला उशीर होत असल्याचे एसटीचे वाहक -चालक सांगतात.
>सायंकाळी पनवेल एमआयडीसीतून येण्यासाठी ज्याप्रमाणे सकाळी जाण्यासाठी गाड्या आहेत त्याप्रमाणे जादा गाड्या सोडाव्यात. पनवेल-डोंबिवली विना थांबा गाड्या सुरू कराव्यात. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यासाठी परिवहन मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्न सोडवावा.
- सुधीर पाटील, प्रवासी
>इच्छित स्थळाचे अंतर तपासून त्यानुसार एसटीच्या वेळापत्रकात बदल होणे अपेक्षित आहे. प्रवाशांना वेळोवेळी गाड्यांच्या फेऱ्यांबाबत सूचना देणे गरजेचे आहे. याशिवाय पनवेल स्थानकावरील पोलीस चौकीत २४ तास कर्मचारी असावेत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.