उशीर झाल्याने शौचालय साफ करण्याची शिक्षा
By Admin | Published: October 13, 2016 05:24 AM2016-10-13T05:24:44+5:302016-10-13T05:25:15+5:30
शाळेत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडून शाळेतील शौचालयाची स्वच्छता करून घेतल्याचा संतापजनक प्रकार
लोणार (जि. बुलडाणा) : शाळेत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडून शाळेतील शौचालयाची स्वच्छता करून घेतल्याचा संतापजनक प्रकार नगर पालिकेच्या काटेनगरातील उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत सोमवारी १0 आॅक्टोबर रोजी घडला.
नगर पालिकेच्या उर्दू पूर्व माध्यमिक शाळेच्या इयत्ता ७ वीत शिक्षण घेणाारा शे. रेहान शे.उस्मान यास शाळेत येण्यास उशीर झाला. शाळेत पोहोचला त्यावेळी राष्ट्रगीत सुरू असल्याने तो फाटकाबाहेर थांबला. राष्ट्रगीत संपल्यानंतर त्याने शाळेत प्रवेश करताच मुख्याध्यापक मुजाहिद यांनी त्याला थांबण्यास सांगून शाळेत उशिरा येण्याचे कारण विचारले. उशिरा आल्याबद्दल रेहानकडून शाळेतील शौचालय स्वत: उभे राहून स्वच्छ करून घेतले. वडील शे. उस्मान यांनी याबाबत विचारणा केली असता, विद्यार्थ्यांनी शाळेत उशिरा येऊ नये, याकरिता शिक्षा केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
शौचालय साफ करून घेतल्याने रेहानची प्रकृती ढासळली असून, त्याला तापसुद्धा आला आहे. यामुळे सदर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापकास सेवेतून निलंबित करण्याची मागणी शे.उस्मान शे.दाऊद यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि जिल्हाधिकारी बुलडाणा, यांच्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)