पोलीस व्हॅनमध्येच प्रसूती
By admin | Published: December 21, 2015 02:21 AM2015-12-21T02:21:07+5:302015-12-21T02:21:07+5:30
पहाटे साडेतीनची वेळ रस्त्यावर शुकशुकाट अवघडलेली स्त्री आणि तिच्यासोबत कुठे, कुणाची मदत मिळतेय का, हे पाहणारी एक वयस्क महिला इतक्यातच, एक पोलीस व्हॅन ‘जीवनदूत’च्या रूपाने त्यांच्याजवळ येऊन थांबते
पुणे : पहाटे साडेतीनची वेळ... रस्त्यावर शुकशुकाट... अवघडलेली स्त्री आणि तिच्यासोबत कुठे, कुणाची मदत मिळतेय का, हे पाहणारी एक वयस्क महिला... इतक्यातच, एक पोलीस व्हॅन ‘जीवनदूत’च्या रूपाने त्यांच्याजवळ येऊन थांबते. अवघडलेल्या स्त्रीच्या वेदना पाहून त्यांना व्हॅनमध्ये घेतले जाते. रुग्णालयाच्या दिशेने प्रवास सुरू होतो... काही वेळातच ती व्हॅनमध्ये प्रसूत होते... आणि त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात सुखरूपपणे पोहोचविण्याचे आगळेवेगळे ‘कर्तव्य’ पोलीस पार पाडतात.
पोलीस व्हॅनमध्येच प्रसूती झालेल्या अलका वैभव बालगुडे (२८) हिला पुत्ररत्न झाले असून, दोघांचीही स्थिती उत्तम आहे. घोरपडे पेठेतील महापालिकेच्या उद्यानालगत राहणाऱ्या आपल्या आई माणिकबाई पवार यांच्याकडे बाळंतपणासाठी अलका आली होती. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांना वेदना सुरू झाल्याने, आईने बिबवेवाडी येथे राहणारी मोठी मुलगी शोभा डांगे हिला फोन करून बोलावून घेतले. वेदना असह्य झाल्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.
रस्त्याच्या कडेलाच घर असल्याने, अलका रस्त्यावर येऊन थांबली, तर माणिकबाई यांनी वाहनाची शोधाशोध सुरू केली. इतक्यात, परिसरात गस्त घालत असलेली खडक पोलीस ठाण्याची व्हॅन त्या ठिकाणी आली. अलका यांना प्रसूती वेदना होत असल्याचे पाहून, त्यांना तत्काळ व्हॅनमध्ये घेतले. व्हॅन थोडी पुढे गेलेली असताना त्यांची प्रसूती झाली.
हा तर आमचा पुनर्जन्म!
पोलीस व्हॅन आली, तेव्हा खूप वेदना होत होत्या. नेमक्या वेळी व्हॅन आल्याने आमचा पुनर्जन्म झाला. पोलीस देवासारखे धावून आले. त्यांनी सहकार्य केले नसते, तर काय झाले असते याचा विचारही करवत नाही, अशी भावना अलका बालगुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.