निवासी डॉक्टरांच्या प्रसूती, क्षयरोगासाठीच्या भरपगारी रजेला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:42 AM2018-12-13T05:42:30+5:302018-12-13T05:42:51+5:30
राज्यभरातील निवासी डॉक्टर गेली अनेक वर्षे प्रसूती तसेच क्षयरोग झाल्यास रजा मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहेत.
मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर गेली अनेक वर्षे प्रसूती तसेच क्षयरोग झाल्यास रजा मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून निवासी महिला डॉक्टरांसाठीच्या प्रसूती तसेच क्षयरोगाच्या भरपगारी रजेला वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाने मान्यता दिली आहे.
पदव्युत्तर शिक्षण घेत असताना निवासी डॉक्टरांना क्षयरोगाची लागण झाल्यास भरपगारी (विद्यावेतन) रजा मंजूर होत नसल्याचे निदर्शनास आले होते. नुकतीच निवासी डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत यासंदर्भात बैठक झाली. यावेळी निवासी डॉक्टरांच्या गैरहजेरीच्या काळात रुग्णसेवेसाठी बदलीने घ्यावयाच्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनासंदर्भातील आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. रुग्णालय प्रशासनाकडे निवेदन आल्यास संबंधित विभागप्रमुख, अधिष्ठाता यांनी निवासी डॉक्टरांच्या भरपगारी रजेची शिफारस सात दिवसांच्या आत संचालनालयाकडे पाठवावी, असा निर्णय घेण्यात आला. या शिफारशीला १५ दिवसांच्या आत मंजुरीचे आदेश देण्यात येतील, असे या बैठकीत ठरल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी दिली. याचप्रमाणेच महिला निवासी डॉक्टरांच्या प्रसूती रजेविषयी प्रस्ताव मान्य करण्यात आल्याची माहितीही डॉ. चिरवटकर यांनी दिली.
लवकरच परिपत्रक काढणार
निवासी महिला डॉक्टरांसाठीची प्रसूती तसेच क्षयरोग झाल्यास देण्यात येणारी भरपगारी रजा सुरूवातीला वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या स्तरावर मान्य करण्यात येईल. या निर्णयाविषयीचे परिपत्रक लवकरच काढण्यात येईल. मात्र, त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जाईल, असे निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी सांगितले.