उदासीनतेमुळे वसमत रस्ता ओसाड
By Admin | Published: June 6, 2017 12:03 AM2017-06-06T00:03:28+5:302017-06-06T00:09:05+5:30
परभणी : चार वर्षांपूर्वी वसमत रस्त्यावरील मोठी झाडे तोडण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चार वर्षांपूर्वी वसमत रस्त्यावरील मोठी झाडे तोडण्यात आली. अद्यापपर्यंत या रस्त्यावर एकही नवीन झाड न लावल्याने रस्ता ओसाड बनला असून या रस्त्याचे गतवैभव परत येणार का? असा प्रश्न पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कल्याण- निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून जातो. या रस्त्यावर चार वर्षांपूर्वी जागोजागी मोठी झाडे होती. रस्ता रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली. सुरुवातीला झाडे तोडण्यास विरोध करण्यात आला. परंतु, शहराच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवत महानगरपालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीने काही अटी घालत झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर या रस्त्यावरील ७४ झाडे तोडण्यात आली. झाडे तोडण्यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसार प्राधिकरणाने एका झाडाच्या बदल्यात चार झाडे लावणे अपेक्षित होते. तसेच मोठ्या उंचीची झाडे लावून या झाडांचे एक वर्ष संवर्धन करावे, अशा अटी घातल्या होत्या. मात्र महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर अद्यापपर्यंत एकही झाड लावले नाही.
विशेष म्हणजे, चार वर्षांमध्ये किमान चारवेळा वृक्षलागवड मोहिमा झाल्या. या मोहिमेतही वसमत रस्ता वृक्षलागवडीपासून वंचित ठेवण्यात आला. त्यामुळे एकेकाळी दाट झाडी आणि सावली असलेला हा रस्ता आज मात्र ओसाड बनला आहे. त्यामुळे वसमत रस्त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाबरोबरच सर्वसामान्यांनी या रस्त्यावर वृक्ष लागवड करण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.