डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने १९ जणांवर गुन्हे दाखल
By admin | Published: September 21, 2016 03:05 AM2016-09-21T03:05:31+5:302016-09-21T03:05:31+5:30
शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे.
नवी मुंबई : शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतु यानंतरही निष्काळजीपणा करणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नवी मुंबईमध्ये तापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. करावेमध्ये डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. महापालिकेचे कर्मचारी योग्यप्रकारे काम करत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेने मात्र नागरिकच योग्य खबरदारी घेत नसल्याचा दावा केला आहे. वैद्यकीय अधिकारी कविता बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने करावे परिसरात डेंग्यू व मलेरियाच्या अळ्या शोधण्याची मोहीम सुरू केली होती. यामध्ये साई वाडी झोपडपट्टीमध्ये अनेक नागरिकांच्या घरामध्ये अळ्या सापडल्या. या परिसरात महापालिकेने यापूर्वीही जनजागृती केली होती. पोस्टर्स लावून पाणी साचून देवू नये असे आवाहन केले होते. परंतु यानंतरही नागरिकांनी काळजी घेतली नसल्याने हा प्रकार घडला आहे.
साई वाडीतील नागरिकांच्या घरात पाण्याचे ड्रम, भंगार साहित्य व इतर ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. या प्रकारास येथील रहिवासीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून महापालिकेचे कर्मचारी बाळकृष्ण ज्ञानदेव वर्ये यांनी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या डासांच्या उत्पत्तीस जबाबदार धरून १९ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डेंग्यूची साथ पसरल्यास उपाययोजना होण्याऐवजी गुन्हेच दाखल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
>गुन्हे दाखल केलेल्यांची नावे
अलोक सिंग, काळू सिंग, शकिल शेख, रामचंद्र शर्मा, शेखर नाईक, अखिलेश यादव, अजित साळुंखे, बिराज सोनार, सुनील सोनावणे, राजू बाबू, दीपक माने, शिवाजी वायदंडे, प्रमिला मेवाला, बालकदास, रंजना अहिरे, जे. के. नाईक, बाबू पटेल, नारायण गुजर यांचा समावेश आहे.